कापूस खरेदीतील टोकन घोटाळा भोवला; बाजार समिती सचिव निलंबित 

उमेश काटे
Saturday, 23 January 2021

शेतकऱ्यांना वगळून नावनोंदणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले होते. त्याचप्रमाणे क्रमवारीत टोकन न देता अनियमित टोकनवाटप झाली.

अमळनेर : कापूस खरेदीत २०१९- २० या वर्षात टोकन घोटाळा केल्याने येथील बाजार समितीचे सचिव डॉ. उन्मेष राठोड यांना जिल्हा उपनिबंधकाच्या आदेशान्वये प्रशासक गुलाबराव पाटील यांनी तीन महिन्यांसाठी निलंबित केले.

Breaking : नंदुरबारमध्ये जीप दरीत कोसळली; सहा मजुरांचा जागीच मृत्यू

 

गेल्या वर्षी शासनाच्या कापूस खरेदी योजनेत नावे नोंदलेल्या शेतकऱ्यांना वगळून नावनोंदणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले होते. त्याचप्रमाणे क्रमवारीत टोकन न देता अनियमित टोकनवाटप करून त्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप माजी आमदार शिरीष चौधरी व काही शेतकऱ्यांनी करून तक्रार केली होती. 

चौकशीत दोषी आढळले

सहाय्यक निबंधक गुलाबराव पाटील चौकशी करून जिल्हा उपनिबंधकांना अहवाल पाठविला होता. त्यावरून जिल्हा उपनिबंधकांनी पाचोऱ्याच्या सहाय्यक निबंधकांना महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियम) अधिनियम ४० अन्वये चौकशीसाठी नेमले होते. त्या चौकशीत सचिव डॉ. उन्मेष राठोड दोषी आढळले.

आवर्जून वाचा- अफगाणिस्तानमध्ये घबाड सापडले आणि गुरूजी मोहात अडकले; मग काय, जे व्हायचे होते तेच झाले! 
 

तीन महिन्यासाठी निलंबीत

त्यांनी दोषारोपचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांना पाठविला. महाराष्ट्र पणन अधिनियम १९६७ च्या नियम १०६ प्रमाणे दुय्यम कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सचिवांची होती. मात्र, त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने जिल्हा उपनिबंधकानी सचिव राठोड यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचे निर्देश गुरुवारी प्रशासक गुलाबराव पाटील यांना दिले होते. त्यानुसार गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता.२२) तीन महिन्यांसाठी डॉ. राठोड यांना निलंबित केले असून, सचिवपदाचा पदभार उपसचिव मंगलगीर गोसावी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner cotton procurement token scam officer suspended