विप्रोचा मातृ प्रकल्‍प असलेल्‍या अमळनेरमध्ये होणार एमआयडीसी

amalner create midc
amalner create midc

अमळनेर (जळगाव) : तालुक्यात नवीन एमआयडीसी उभारण्याच्या मागणीला हिरवा कंदील मिळाला आहे. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मंगरूळ एमआयडीसीत मूलभूत सुविधा व विप्रो कंपनीसाठी रस्ते याबाबत सकारात्मक भूमिका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मान्य करत योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन गुरुवारी (ता. ३) मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. 
बैठकीत उद्योगमंत्र्यांसह पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, उद्योग विभागाचे अधिकारी, कर्मचारी व एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते. अमळनेर सहकारी औद्योगिक वसाहतीबाबत आमदार अनिल पाटील यांनी माहिती देताना सांगितले, की तालुक्यातील मंगरूळ सहकारी औद्योगिक वसाहतीची स्थापना १९७३ मध्ये झाली असून, शासनाच्या ध्येयधोरणानुसार १९८० मध्ये उद्योग कार्यान्वित होण्यास सुरवात झाली. औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेपासून संस्थेच्या कार्यक्षेत्रात उद्योजकांसाठी कुठल्याही मूलभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत. संस्थेकडे नाममात्र प्लॉट भाड्याव्यतिरिक्त इतर कुठलेही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे उद्योजकांसाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तसेच शासन स्तरावरूनदेखील आजतागायत कुठलाही निधी मिळालेला नाही. पर्यायाने संस्थेच्या विकास व प्रगतीस अडथळा निर्माण होतो. 

आठशे कामगारांना रोजगार पण..
संस्थेकडे आतापर्यंत उपलब्ध असलेले शंभर प्लॉट व एक सीस इंडस्ट्रीजचा प्लॉट असे एकूण १०१ प्लॉटचे वाटप उद्योजकांना केले आहे. त्यावर एकूण ६८ उद्योजकांनी आपले उद्योग कार्यान्वित केले असून, त्यातून सुमारे ८०० कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे; परंतु उद्योजकांना आपल्या उद्योगस्थळी जाण्या-येण्यासाठी पक्के रस्ते, पथदीप, पाणीपुरवठा, गटारी आदी मूलभूत सुविधा नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी संस्थेतर्फे आमदार अनिल पाटील यांनी मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शिफारस करून द्यावी, अशी मागणी केली. 

विप्रोचा मातृ प्रकल्‍प अमळनेरमधूनच
विप्रो उद्योगसमूहाचा पहिला मातृ प्रकल्प अमळनेर येथे असून, सध्या त्या प्रकल्पातून संतुर साबणाचे उत्पादन सुरू असून, दळणवळणाच्या सोयीअभावी प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत होत नाही. स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. तरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यन्वित राहण्यासाठी व भविष्यात विप्रो उद्योगसमूह अमळनेर येथे नवीन प्रकल्प आणू इच्छितो. त्यासाठी दळणवळणाची सोय सुलभ होण्यासाठी खालील रस्त्यांना मान्यता मिळावी, अशी मागणी केली. 

‘विप्रो’साठी हवी चार रस्त्यांना मंजुरी 
विप्रो समूह नवीन प्रकल्प आणू इच्छित आहे. त्यासाठी धार-अंतुर्ली ते विप्रो कंपनी अंदाजित रक्कम चार कोटी नंदगाव-तासखेडा अंतुर्ली ते विप्रो कंपनी अंदाजित रक्कम सात कोटी, राममंदिर ते रामवाडी तांबेपुरा ते विप्रो कंपनी अंदाजित रक्कम तीन कोटी, रामा १५ ते विप्रो कंपनी नदीकाठ तीन कोटी अशा चार रस्त्यांना मंजुरी मिळून दळणवळण सुविधा उपलब्ध करून द्यावी. ती झाल्यास नवीन प्रकल्प विप्रो समूह आणू शकेल, अशी मागणी आमदार पाटील यांनी बैठकीत केली. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com