जास्‍त मजुरी देवूनही मजुर मिळेना; शेतकऱ्यांची होतेय तारांबळ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये वातावरणात बदल झाला. त्यामुळे शेती कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे. मात्र मजुरांअभावी शेतकामात अनेक अडचणी येत आहेत.

वावडे (जळगाव) : अमळनेर तालुक्‍यातील वावडे परिसरातील शेतकरी सध्या शेतीच्या कामात मग्न असल्याचे दिसून येत आहेत. शेतातील ज्वारी, बाजरीचे यंत्राद्वारे मळणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वावडे व इतर परिसरात सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे शेतीकामाला ‘ब्रेक’ मिळाला होता. 

गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये वातावरणात बदल झाला. त्यामुळे शेती कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे. मात्र मजुरांअभावी शेतकामात अनेक अडचणी येत आहेत. जास्त मजुरी देऊनसुद्धा मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. 

पीक जोमात होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे कापसासह पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच मजुरांची कमतरतेमुळे जास्त मजुरी देऊन सुद्धा शेती कामासाठी मजूर मिळत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. मका, बाजरी मळणीसाठी एकरी तीन हजार रुपये लागतात तर शेतकाम करण्यासाठी एका दिवसाची मजुरी ३०० रुपये द्यावे लागतात. सततचा पाऊस त्यासोबत परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमजोर झाला आहे. त्यासोबत शेतीकामासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. 

कापूस वेचणीच्या दरात वाढ 
मागच्या वर्षी कापूस वेचणीसाठी ४ ते ५ रुपये प्रतिकिलो हा भाव होता कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे बाहेरगावावरून मजूर आणावे लागत असल्यामुळे कापूस वेचणीसाठी ७ते ८ रुपये प्रति किलो दर शेतकऱ्यांनी मजुराला द्यावा लागत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner farmer not available worker and painding work