esakal | ‘कोड लँग्वेज’ लयभारी..संबळ वाजवून करतो इशारे; तिकडे ओळखतो नाव!
sakal

बोलून बातमी शोधा

hand finger code language

शिक्षण घेऊनही नोकरीचा अभाव आहे. शेती नाही, घर जेमतेम कुटूंबाचा निवारा होईल एवढेच ! त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करावी लागते. काळाच्या ओघात ही लोककला लुप्त होत आहे. ती जिवंत राहण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.

- दरबार वकील शेगर, भटके कलाकार

‘कोड लँग्वेज’ लयभारी..संबळ वाजवून करतो इशारे; तिकडे ओळखतो नाव!

sakal_logo
By
उमेश काटे

अमळनेर (जळगाव) : डिजिटल युगात क्यू आर कोड स्कॅन करून ज्या पध्दतीने आर्थिक व्यवहार केले जातात. त्याच धर्तीवर आपल्या हाताच्या बोटांच्या विशिष्ट प्रकारच्या हालचाली करून ‘कोड लँग्वेज’ने वाडवडिलांचा नामोल्लेख अचूक करतात. ही पारंपरिक लोककला डिजिटल युगात ही जिवंत आहे. लॉकडाऊनच्या काळात ही लोककला जिवंत ठेवणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला रोजगार कसा उपलब्ध होईल; याकडे शासनाने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी समाज मनातून व्यक्त होत आहे.

गोशिंग (ता. नांदुरा, जि. बुलढाणा) या गावातील मूळ रहिवाशी व सध्या येथील गजानन महाराज मंदिराशेजारी उघड्यावर सध्या तात्पुरता निवारा घेतलेले नाथगोंधळी कलाकार हे पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदारी हिंडत आहेत. प्रत्येक शहवासीयांच्या घरोघरी जाऊन हाताच्या बोटावर एकनाथ नाना शेगर यांनी त्यांचा सहकारी संबळ वादक दरबार वकील शेगर यांना आपल्या बोटांच्या विशिष्ट प्रकारच्या हालचाली करून ‘कोड लँग्वेज’चा चांगला वापर करतात. न बोलता केवळ बोटांच्या इशाऱ्यावरने आपण सांगितलेल्या वाडवडिलाचे नाव अचूक ओळखतात. 

दारोदारी भटकंती
कुटुंबातील वाड वडिलांच्या नावाचा संबळ, टाळ, तुणतुणे आणि वेगवेगळी गाणी, गौळण, यांच्या सुरेल संगमावर तालबद्ध अशा ठेक्यात उद्धार करून यथाशक्ती मिळेल ती आर्थिक तुटपुंजी, धान्याच्या रुपात मिळालेली मदत आणि आशीर्वाद घेऊन पुढच्या दारी भटकंती करून आपला जीवन प्रवास करीत आहेत. 

असा असतो भटकंतीचा जीवनप्रवास
शेगर काका- पुतणे हे आपला उदार निर्वाह भागविण्यासाठी आपल्या पत्नी व बालगोपाळाना आपल्या गावाला सोडून जिल्ह्यात तसेच परजिल्ह्यातील ठिकाणी भटकंती करतात. पुरुष मंडळी कोणत्याही गावालगत असलेल्या मंदिराशेजारी किंवा पाण्याची सोय असेल अशा ठिकाणी आठ- पंधरा दिवस थांबून आपल्या अंगी असलेली कला आणि त्याचे प्रत्यक्ष सादरीकरण करतात. यावर मिळेल त्या मदतीवर जीवनाची गुजराण करत असतात. अपेक्षित धान्य व आर्थिक तुटपुंजी जमा झाल्यावर आपल्या मूळ गावी परत जातात. अशी भ्रमती दरवर्षी पाचवीलाच पुजलेली असल्याची खंत ही ते व्यक्त करतात.

बोटांच्या इशाऱ्याची भाषा हवी अभ्यासक्रमात
आपल्या भावना दुसऱ्या पर्यंत पोहचविणे म्हणजेच भाषा होय. ही भाषा केवळ शब्दातून च व्यक्त होते. असे नाही तर ती केवळ आवाज तसेच इशाऱ्यावर ही व्यक्त होते. भाषेच्या समृद्धीसाठी विद्यापीठ स्तरावर अनेक अभ्यासक्रम आहेत. बोटांच्या इशाऱ्याची अजब गजब भाषा ही कुतूहलाचा विषय तसेच न उमजनारे कोडे आहे. या लोककलेचा अभ्यासक्रमात समावेश केल्यास याचे प्रात्यक्षिके करण्यासाठी नाथ गोंधळी समाजातील कलाकाराना रोजगार मिळू शकतो. पर्यायाने भाषे बरोबरच कलाकारांचाही उध्दार होवू शकतो यासाठी शासनाने सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा ही भाषा समुळ नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, एवढे मात्र निश्चित! 

सध्या कोरोनाचा कहर आणि लॉकडाऊनचा खडा पहारा यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे . त्यामुळे शासनाने आमच्या सारख्या भटक्या कलाकारांना रोजगार कसा उपलब्ध होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्थिर मानधन मिळण्याबाबत शासनाने विचार करावा ही माफक अपेक्षा. 

- एकनाथ नाना शेगर, भटके कलाकार

संपादन ः राजेश सोनवणे