मित्र पोहणे शिकायला गेले...आणि शिकता शिकता दोर तुटला अन बुडाले

अमोल पाटील
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

पट्टीतील पोहणाऱ्यांनी पटापट नाल्यात उड्या टाकून दोघा मुलांचे मृतदेह अवघ्या पंधरा मिनिटांत बाहेर काढले. दोघांच्या कुटुंबीयांनी आपल्या काळजाच्या तुकड्यांना पाहून तेथेच हंभरडा फोडला.

अमळनेर :  लोंढवे वाघोदे (ता. अमळनेर) शिवारातील १५ फूट खोल नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या लोंढवे येथील दहावीत शिकणाऱ्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (ता. १) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, त्यांचा तिसरा मित्र मात्र सुखरूप आहे. 

लोंढवे (ता. अमळनेर) येथील (स्व.) एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयात दहावीत शिकणारे भावेश बळिराम देसले (वय १५), हितेश सुनील पवार (वय १५) आणि जयवंत सुरेश पाटील हे तिघे मित्र शनिवारी जवळच असलेल्या वाघोदे शिवारातील नाल्यात पोहण्यासाठी गेले होते. पावसामुळे हा नाला तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे या नाल्यात पोहत असताना भावेश देसले आणि हितेश पवार हे दोन्ही १५ फूट खोल पाण्यात गेले. मात्र, दुर्दैवाने दोन्ही मित्रांचा पाय पाण्यात अधिकच खोल गेला. दोन्ही मित्र बुडत असल्याचे पाहून जयवंत पाटील हा मित्रही गलितगात्र झाला. थरथरत्या अंगाने आणि कापऱ्या आवाजाने त्याने दोघांना वाचविण्यासाठी आरडाओरड केली. परंतु जवळ कोणीच नसल्याने मदतीला कोणीच आले नाही म्हणून त्याने गावात धाव घेऊन दोघे मित्र पाण्यात बुडल्याची माहिती दिली. लगेच भावेश, हितेश यांच्या कुटुबीयांसह ग्रामस्थ त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील, सरपंच कैलास खैरनार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यातील पट्टीतील पोहणाऱ्यांनी पटापट नाल्यात उड्या टाकून दोघा मुलांचे मृतदेह अवघ्या पंधरा मिनिटांत बाहेर काढले. दोघांच्या कुटुंबीयांनी आपल्या काळजाच्या तुकड्यांना पाहून तेथेच हंभरडा फोडला. त्यांच्या आईचा आक्रोश मन हेलावणारा होता. शेजारांनी त्यांचे सांत्वन करीत धीर दिला. दोघा जीवलग मित्रांचा असा दुर्दैवी झालेला मृत्यू पाहून आख्खा गाव सुन्न झाला आहे. 

पोहायला शिकणे बेतले जिवावर 
भावेश, हितेश आणि जयवंत हे तिन्ही मित्र नववी पास होऊन यंदाच दहावीत गेले होते. यात भावेश याला चांगले पोहता येत होते. परंतु मित्र हितेश याला पोहता येत नसल्याने त्याला दोर बांधून भावेश पोहण्याचे शिकवत होता. तर जयवंत हा काठावर बसून पाहत होता. त्यालाही दोघांनी पोहण्यासाठी येण्याचा अग्रह केला होता. परंतु त्याला पोहता येत नसल्याने तो नाल्यात उतरलाच नाही. काही वेळाने हितेशचा तोल जाऊ लागला. त्यात त्याला बांधलेला दोरही तुटला. त्यामुळे भावेशने त्याला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. जयवंत काठावरून मदतीचा प्रयत्न करीत होता. 

दोन्ही सामान्य शेतकरी कुटुंबातील मुले 
भावेश आणि हितेश या दोन्ही मित्रांचे वडील शेतकरी असून, त्यांची घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे. तर भावेश हा एकुलता मुलगा होता. तसेच त्याला एक बहीण आहे. तर हितेश हे तीन भाऊ असून, तो घरात सर्वांत मोठा होता. यामुळे या दोन्ही कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, जयवंतही दोन्ही मित्रांना डोळ्यांदेखत बुडलेले पाहून घाबरला आहे. तर भावेश आणि हितेश यांचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणून विच्छेदन करण्यात आले. या वेळी लोंढवे येथील ग्रामस्थ, दोन्ही मुलांचे कुटुंबीय, नातलग आणि त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून धीर दिला.

 संपादन- भूषण श्रीखंडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner learn to swim and two studant Drowned deth