
कांद्याचा सरासरी भाव काढल्यास भाववाढीचा भडका थांबविण्यास मदत होऊन शेतकऱ्यांवरही आंदोलनाची वेळ येणार नाही. सध्या कांद्याला सरासरी साडेसात हजार रुपये क्विंटल भाव आहे.
वावडे (ता. अमळनेर) : कांद्याच्या भावात चढ-उतार नेहमीच होतात; मात्र सध्या काहीच ठिकाणी एखाद-दोन कांदा गोण्या चांगला भाव मिळाला, की त्यांच्या पट्ट्या सोशल मीडियावर व्हायरल होतात. कांद्याचा भाव वाढल्याचा आभास निर्माण केला जातो. परिणामी, चांगल्या भावाच्या आशेने शेतकरी जास्त माल विक्रीस आणतात आणि फसतात. मालाची आवक वाढताच भाव पाडले जातात. शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येते.
आवश्य वाचा- सरकारमधील मंत्र्यांनी पीकविमा कंपन्यांशी हातमिळवणी करून शेतकऱ्यांची केली फसवणूक : महाजन
कांद्याचे भाव अचानक वाढणे वा कमी होणे, हा प्रकार तसा नित्याचाच; परंतु तो कशामुळे होतो, याचे कोडे अजून शेतकऱ्यांना सुटलेले नाही. बाजारात कांदा आल्यावर काही व्यापारी मोजक्याच दहा-वीस शेतकऱ्यांना चांगला भाव देतात. त्यातून कांद्याचे भाव वाढल्याचे चित्र निर्माण होते. सोशल मीडियातून ते गावोगावी पसरते. यातून भाव वाढल्याचा आभास निर्माण होऊन शेतकरी चांगले भावाच्या अपेक्षेने आपलाही कांदा बाजारात आणतात आणि भावात घसरण सुरू होते. शेतकरी आक्रमक होतात. लिलाव बंद पाडण्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. काही व्यापारी आपले हित साधण्यासाठी, तसेच साठेबाजीसाठी असे प्रकार करतात. मात्र, त्यात फरफट होते ती सामान्य शेतकऱ्यांची. त्यामुळे बाजार समित्यांनी लिलावाच्या भावाची माहिती देताना, जादा भाव निघालेल्या कांद्याच्या किती गोण्यांची विक्री झाली, याचीही माहिती देणे आवश्यक आहे. त्यातून कांद्याचा सरासरी भाव काढल्यास भाववाढीचा भडका थांबविण्यास मदत होऊन शेतकऱ्यांवरही आंदोलनाची वेळ येणार नाही. सध्या कांद्याला सरासरी साडेसात हजार रुपये क्विंटल भाव आहे. मात्र, काही ठिकाणी मोजक्या कांद्याचा १२ हजार रुपये क्विंटलने विक्री झाल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
भाववाढीची शक्यता
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातच नव्हे, तर अन्य राज्यांतही लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातून पीक गेले. त्यामुळे कांदा उत्पादन कमी झाले असून, चाळीमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे