
प्रत्येक घरासमोर शोषखड्डे असल्यामुळे शंभर टक्क शोषखड्डे असणारे गाव झाले आहे. शेताची बांध बंदिस्ती व शेततळी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मृदा व जलसंधारण यांची कामे झाली आहेत.
अमळनेर : केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालय (नवी दिल्ली) च्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार २०१९’साठी अनोरे (ता. अमळनेर) या गावाचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. जलमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण ११ नोव्हेबरला ऑनलाइन होणार आहे. देशपातळीवरील या पुरस्कारामुळे उत्तर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
‘राष्ट्रीय जल पुरस्कार-२०१९’साठी अनोरे (ता. अमळनेर) या गावाने प्रस्ताव सादर केला होता. महाराष्ट्र राज्यातून असंख्य प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आले होते. प्रस्तावांच्या छाननीअंती महाराष्ट्रातून अंतिम पाहणीसाठी अनोरे (ता. अमळनेर) व बोरवा बुद्रुक (जि. वाशिम) फक्त या दोन गावांची निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर जलशक्ती मंत्रालय, भूमी जल बोर्डच्या वरिष्ठ वैज्ञानिक श्रीमती अथिरा (दिल्ली) यांनी अनोरे गावाला भेट देऊन जलसंधारण विषयक झालेल्या कामांची शेतात व गावात पाहणी केली होती. त्यानी गावाने एकजुटीने केलेल्या सर्वच कामाचे कौतुक केले होते. पांझरा-माळन नदी जोड प्रकल्पासाठी ही प्रयत्न व्हावा, अशी मागणी ही त्यावेळी गावकऱ्यांनी केली होती.
वॉटरकप स्पर्धेतही मानकरी
पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत अनोरे हे गाव राज्यात तिसरे तर उत्तर महाराष्ट्रात राज्यस्तर विजेते एकमेव गाव आहे. वॉटर कप स्पर्धेत जलसंधारण, मृद्संधरण, मन संधारणाची गावात अतिशय शास्त्रशुद्ध कामे झाली आहेत. बारामाही टॅंकर असणारे गाव आज टॅंकरमुक्त झाले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये छतावरील पावसाचे शंभर टक्के जमिनीत जिरविणारे अनोरे हे राज्यातील पहिले गाव आहे. प्रत्येक घरासमोर शोषखड्डे असल्यामुळे शंभर टक्क शोषखड्डे असणारे गाव झाले आहे. शेताची बांध बंदिस्ती व शेततळी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मृदा व जलसंधारण यांची कामे झाली आहेत.
विशेष उपक्रमांतून नावलौकिक
पाण्याव्यतिरिक्त ‘एक घर एक झाड’ ही संकल्पना गावात रुजविण्यात आली आहे. संपूर्ण गावाला एकच रंग असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण झाली आहे. लॉकडाउन काळात संपूर्ण अमळनेर तालुक्याला भाजीपाला पुरवणारे गाव म्हणून नावलौकिक मिळविला आहे. या सर्व बाबीचा विचार करून या केंद्र शासनाने पुरस्कारासाठी निवड केली असल्याची माहिती गुरुकृपा प्रतिष्ठानचे सचिव खुशाल पाटील यांनी दिली.
संपादन- भूषण श्रीखंडे