शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी नवा कायदा : गृहमंत्री अनिल देशमुख

उमेश काटे
Monday, 2 November 2020

आंध्र प्रदेशात जाऊन दिशा कायद्याबाबत चर्चा केली होती. प्रारूप तयार आहे. कालबद्ध कार्यक्रम नवीन कायद्यात असणार आहे. पुढच्या अधिवेशनात कायदा येईल. शेतकऱ्यांच्या बाबतीत कडक कायदा धोरण राबविण्यात येणार आहे.

अमळनेर (जळगाव) : व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबावी, यासाठी राज्य शासन नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. हा कायदा अमलात आल्यास शेतकऱ्यांसाठी कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. येथे पोलिस वसाहतीच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. 
येथील नव्या पोलिस निवासस्थानातून एरंडोल पोलिस ठाण्याचे कळ दाबून ऑनलाइन उद्‌घाटन केले. त्यानंतर नवीन पोलिस वसाहतीचे फीत कापून गृहमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार लता सोनवणे, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, संजय गरुड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे आदी उपस्थित होते. 
मंत्री देशमुख म्हणाले, की आंध्र प्रदेशात जाऊन दिशा कायद्याबाबत चर्चा केली होती. प्रारूप तयार आहे. कालबद्ध कार्यक्रम नवीन कायद्यात असणार आहे. पुढच्या अधिवेशनात कायदा येईल. शेतकऱ्यांच्या बाबतीत कडक कायदा धोरण राबविण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात लवकरच वरणगाव प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहोत. त्यासाठी हळूहळू प्रक्रिया सुरू करू. सरकार येताच वसाहतीची बैठक घेतली. त्यात ७०० कोटी रुपये पहिल्या टप्प्यात मंजूर केले. मात्र, कोरोनामुळे हा निधी लांबला. जसा निधी येईल तशी कामे होतील. 

चांगले कारागृह व्हावे : पालकमंत्री 
गुलाबराव पाटील म्हणाले, की जिल्ह्यात इतर ठिकाणीही मोठ्या समस्या आहेत. हतनूर एसआरपी पोलिस प्रशिक्षण केंद्र १५६ एकर जागा अधिग्रहीत केली आहे, त्याला मंजुरीदेखील मिळाली आहे. नवीन चांगल्या कारागृहासाठी जिल्ह्यासाठी परवानगी द्यावी. भुसावळ या ठिकाणी कारागृहदेखील निर्माण करावे. पाळधी दूरसंचार असल्याने पोलिस ठाणे मंजुरी द्यावी. एमआयडीसी म्हसावद-चोपडा ४६ निवासस्थाने तातडीने पूर्ण करावीत. यावल-फैजपूर येथेही पोलिस ठाणे असावे, अशा मागण्या केल्या. 

चौकी सुरू करणार : दिघावकर 
श्री. दिघावकर म्हणाले, की नाशिक विभागात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचे साडेपाच कोटी रुपये परत मिळवून दिले. शेतकऱ्यांसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात खुर्चीची पहिल्या रांगेत जागा द्यावी, असे निर्देश दिले आहेत. अमळनेर शहर पोलिस ठाणे लांब असून, या ठिकाणी पोलिस ठाणे लांब असल्याने या ठिकाणी रात्री-अपरात्री महिला वृद्ध व तक्रारदार यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी गावातील पोलिस चौकी सुरू करून सोय निर्माण करणार आहोत. डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जिजाऊ महिला व्यायामशाळा, योगा हॉल व सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले. 

नाथाभाऊ आले अन् लगेच गेले... 
शहाद्याहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत माजी मंत्री एकनाथ खडसे हेलिकॉप्टरने अमळनेरला आले. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निवासस्थानी काही वेळ थांबले. कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मात्र, गृहमंत्री कार्यक्रमस्थळी रवाना झाल्यानंतर श्री. खडसे जळगावकडे रवाना झाले. ते कार्यक्रमाला न आल्याने चर्चेला उधाण आले होते. 

एसआरपी प्रशिक्षण केंद्र वरणगावातच 
जळगाव : वरणगाव (ता. भुसावळ) येथे मंजूर झालेले राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र जामखेडला हलविण्यात आले होते. मात्र, ते वरणगावातच राहील, अशी ग्वाही श्री. देशमुख यांनी अमळनेर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासमोर आपण ही ग्वाही देत असल्याचेही त्यांनी नमूद केले. खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner new rules in stop farmers fraud anil deshmukh