अमळनेरचा पुरातन दगडी दरवाजा दिसणार नव्या डिझाईनमध्ये

अमोल पाटील
Sunday, 6 September 2020

पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस मगन गर्गे यांनी परवानगी देण्याबाबतचे पत्र अमळनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना दिले असून यात सदर स्मारक जतन, संगोपन आणि दुरुस्तीसाठी दहा वर्षांच्या कालावधीसाठी पालिकेस देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

अमळनेर : शहरातील राज्य संरक्षित स्मारक तथा दगडी दरवाजा अमळनेर नगरपालिकेकडे हस्तांतरीत व्हावा; यासाठी प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अखेर यश आले असून यासंदर्भात आमदार अनिल पाटील यांनी स्वतः शासन दरबारी जोमाने पाठपुरावा केल्याने पुरातत्व विभागाने सदरचे स्मारक दहा वर्षांसाठी हस्तांतरण करण्यास परवानगी दिली आहे. आता या दरवाजाचे नुतनीकरण करण्यात येणार असून पुरातन दगडी दरवाजा नव्या डिझाईनमध्ये पाहण्यास मिळणार आहे.

पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस मगन गर्गे यांनी परवानगी देण्याबाबतचे पत्र अमळनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना दिले असून यात सदर स्मारक जतन, संगोपन आणि दुरुस्तीसाठी दहा वर्षांच्या कालावधीसाठी पालिकेस देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. पुरातत्व विभागाच्या संचालकांनी पालिकेस दिलेल्या परवानगी पत्रात म्हटले आहे की, अमळनेर येथील राज्य संरक्षित स्मारक महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजनेअंतर्गत नगरपरिषद अमळनेर यांना दहा वर्ष कालावधीकरिता संगोपनासाठी देण्यात आले आहे. अमळनेर वेस मुख्य रस्त्यावर असून स्मारकाच्या पूर्वेकडील बुरुजाचा काही भाग २४ जुलै २०१९ ला ढासळल्यामुळे सध्या तेथील मलबा हटवून मातीने भरलेल्या गोण्या रचण्यात आल्या आहेत. सदर वेस मुख्य रस्त्यावर असल्यामुळे नेहमी याठिकाणी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. येथे कोणतीही जिवीत व वित्त हानी होऊ नये याकरीता नगरपरिषद अमळनेर यांनी अमळनेर शहराचा विकास योजनेनुसार सदर वेसचे जतन दुरुस्ती करणेकरिता संदर्भ पत्रान्वये परवानगी मागितली होती.

तर स्‍मारक झाले असते नष्‍टच
अमळनेर वेसची पडझड होऊन तो क्षितिग्रस्त होऊ नये याकरिता नगरपरिषदेने नामिकासुचीतील वास्तुविशारद मे चेतन व्ही. सोनार अमळनेर यांचेकडून सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग नाशिक यांनी दिलेल्या सूचनेनुसार सुधारित सविस्तर अंदाजपत्रक व नकाशे तयार केले आहेत. अमळनेर वेस या राज्य संरक्षित स्मारकाची जतन दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा सदर स्मारक पूर्ण क्षतीग्रस्त होऊन मुख्य रस्त्यावरील वाहतूक वर्दळीमुळे जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे सदर प्रस्तावास अटींच्या अधिन राहून परवानगी देण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. सदरची परवानगी महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षक स्मारक संगोपन योजनेअंतर्गत झालेल्या करारातील अटीच्या अधिन राहून देण्यात आली आहे.

आमदार पाटलांचा पाठपुरावा
माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या सुचनेनूसार अमळनेर पालिकेने दगडी दरवाजा हस्तांतरण करण्याची केलेली मागणी योग्य आणि जनहीताची व अमळनेर शहराच्या दृष्टीने आवश्यक असल्याने आमदार अनिल पाटील यांनी मागणी करत पाठपुरावा केला. प्रत्यक्षात पुरातत्व विभागाकडून कोणतीही जुनी वास्तू दुसऱ्या संस्थेला जतन म्हणून देणे अशक्य होते. परंतु पुरातत्व विभागाकडून या बुरुजाची लवकर दुरुस्ती होणे अवघड असल्याने व हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाल्याने शहरात मुख्य मार्गावर वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होऊन येथील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविल्याने शहरी रस्त्याचे तीनतेरा वाजले होते. यामुळे कोणत्याही परिस्थितीत लवकर या बुरुजाची दुरुस्ती व्हावी म्हणून हे स्मारक पालिकेकडे येणे आवश्यक होते. 

दरवाजा नूतनीकरणाचे संकेत
सदर बुरुज पालिकेकडे आल्याने आता या दरवाजाचे नव्याने डिझाइन तयार होऊन आधुनिक पद्धतीने नुतनीकरण होण्याचे संकेत मिळाले आहेत. या व्यतिरिक्त राज्य मार्गावर हे स्मारक असतांना येथील रस्ता बुरुजामुळे केवळ सात मीटरचा झाला असून इतर ठिकाणी हा रस्ता १४ मीटरचा आहे. यामुळे सदर ठिकाणी देखील रस्ता १४ मीटरचा होणार असल्याने वाहतुकीची होणारी समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. पालिका पदाधिकारी तातडीने या कामास लागणार असून यासाठी आमदारांची मदत घेतली जाणार आहे. 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner Old Dgdi door handover and new design