‘प्री- वेडींग’ शुटमध्ये आता असेही फॅड; फिल्‍मी दुनियेला ठेवले दूर

pre wedding shoot
pre wedding shoot

अमळनेर (जळगाव) : सध्याच्या तरुणाईला 'प्री- वेडिंग'चे वेड लागले आहे. लग्नाआधीच्या या ‘शूट’मध्ये नव वधू- वरासाठी फिल्मी दुनिया वास्तवात उतरवण्याचा रोमँटिक ट्रेड सुरू आहे. मात्र या ट्रेंडला तिलांजली देत स्वतंत्र पूर्व काळात समाजसेवा करणाऱ्या ‘आदर्श जोडपे’च्या वेशात 'प्री-वेडिंग' शूट करण्याचा नवीन आदर्श पायंडा सुरू केला आहे. पिंपळगाव हरेश्र्वर (ता. पाचोरा) येथील नव वधू- वर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतीराव फुले यांच्या वेशभूषेत केलेले प्री- वेडिंग शूट हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

पिंपळगाव हरेश्र्वर येथील रहिवाशी सीमा पाटील व विनोद राजाराम पाटील यांची कन्या श्वेता तसेच पिंपळगाव हरेश्र्वर येथीलच रहिवाशी उषा लोहार व (कै.) आनंदा शंकर लोहार यांचे चिरंजीव मंगेश यांचा विवाह नुकताच जुळला. लग्न जरी साध्या पद्धतीने करायचे असले तरी लग्नाचे प्री -वेडींग शुट करण्याची कल्पना दोघांच्या डोक्यात होती. ही हौस पूर्ण करण्यासाठी सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या दर्शना पवार यांच्याशी चर्चा केली. यावर त्यांनी आदर्श जोडी म्हणून सामाजिक जाण- भान, जोडीदार विषयी प्रतिष्ठा- सन्मान ठेवत जगलेले आदर्श जोडी कोण डोळ्यासमोर येते? यावर सावित्रीबाई व ज्योतिबा यांचे चेहरे डोळ्यासमोर उभे राहिले. हे खुप मोठे नाव आहेत. त्यांचा आदर्श, मुल्य, एकमेकांप्रतीचा, समाजाप्रतिचा डोळ्यासमोर ठेवून जगण्याचा प्रयत्न मात्र आयुष्यभर करू आणि म्हणून त्यांच्या वेशभूषेत शूट करण्याचा निर्णय घेतला. आपल्या पत्नीच्या मानसन्मान, स्वतंत्र माणूस म्हणूनचे अस्तित्व स्‍विकारणारे ज्योतिबा. स्वतः च्या बाईपणातून बाहेर पडून माणूस म्हणूनच्या अस्तित्वसाठी लढणाऱ्या सावित्रीबाई. ज्यांना समस्त स्रीजातीला अज्ञान अंधार कोठडीतून बाहेर काढले. या सर्व कामात त्यांच्या सोबतीला सतत असलेले ज्योतिबा. ३६ गुण जुळावे तर यांच्या सारखे म्हणून त्यांनी प्रिवेडींग ज्योतिबा साऊंच्या वेशभूषेत केले. 

असे जुळले तार... 
श्वेता पाटील ही साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या आयोजित युवा श्रमसंस्कार छावणीत आली होती. त्यावेळी ती दहावीला होती. छावणीतून प्रेरणा घेऊन गावात जाऊन व्यसन मुक्तीवर काम करण्याचे ठरवले. गावातील लोकांचे प्रबोधन, व्यसनमुक्तीचे दुष्परिणाम हे सर्व श्वेता सोबत ग्रुपमधील इतर सहकारी देखील अतिशय ताकदीने लोकांसोबत संवाद साधत होते. त्या सहकारीमध्ये मंगेश लोहार हा होता. त्यावेळी तो ईजिनेरींगला होता. सुट्टीमध्ये गावात आल्यावर तो या सर्व कामात सहभागी व्हायचा. या सर्व कामातून संवादातून मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ही गोष्ट या दोघांनी सर्वात आधी आपल्या आई- वडिलांना सांगितली. दोन्ही कुटुंबातील लोकांना मान्य करायला थोडा वेळ लागला. मात्र त्यानंतर त्यांनी तो विषय कामातील सहकारीसोबत शेअर केला. विशेष म्हणजे दोन्ही नंतर साने गुरुजी कर्मभूमी स्मारकचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. पण कामात असतांना दोघांनी एकमेकांचे स्वतंत्र अस्तित्व जपले. अतिशय परिपक्वता, सामंजस्य, एकमेकांप्रती सन्मान, एकमेकांची स्वतंत्र अस्तित्वाची जाण होती. कदाचित त्यांनी सांगितले नसते तर कधीही लक्षात आले नसते ते प्रेमात आहेत असे. सामाजिक जाणिवेतून प्रेमाला सुरवात झाली. त्या दोघांनी सर्वात आधी शिक्षण पूर्ण केले. नोकरीला लागले. 

सानेगुरुजी जयंतीच्या दिवशी शुभमंगल 
सध्या मंगेश लोहार हा पुणे येथे ईजिंनिअर असून श्वेता पाटील ही "मासूम" या महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संस्थेत काम करते. नोकरी लागले मग आता लग्न करा या कुटुंबातील लोकांच्या आग्रहाने त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. कमी खर्चात साध्या पद्धतीने लग्न करायचे म्हणून ते येत्या २४ डिसेंबरला साने गुरुजी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर कोर्टात लग्न करणार आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com