esakal | शिक्षण विभागाचा मदतीचा ‘ऑक्सिजन’

बोलून बातमी शोधा

शिक्षण विभागाचा मदतीचा ‘ऑक्सिजन’
शिक्षण विभागाचा मदतीचा ‘ऑक्सिजन’
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : कोरोनाच्या अतिप्रसारामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. एका बाजूला रुग्णांची शोध मोहीम, ॲन्टिजन चाचण्या, ऑक्सिजनची होणारी कमतरता, रेमडेसिव्हिर इंजेक्शन वेळेवर न मिळाल्याने होणारे रुग्णांचे हाल, त्यात दुसऱ्या बाजूला एक मेपासून लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येणार आहे. आरोग्य व्यवस्थेला मनुष्यबळाअभावी काम करण्यात मर्यादा येत असताना सर्वेक्षण व चाचण्या घेण्याकामी प्रशासनाने आता शिक्षकांच्या ड्युटी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत लावलेल्या आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील येणारा ताण काही प्रमाणात का असेना कमी झाला आहे.

यात शहरातील सर्वच कॉलनी परिसरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असताना आशा वर्कर, आरोग्यसेविका यांच्यासोबत शिक्षकांच्या नियुक्त्या करून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या सर्वेक्षणासोबतच ॲन्टिजन कॅम्पच्या ठिकाणी नमुने घेणे, त्याच्या नोंदी ठेवणे आदी ठिकाणी शिक्षक फ्रंटलाइन वर्कर म्हणून कार्य करीत आहेत.

शहरी भागात वेगवेगळ्या टीम तयार करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत ॲन्टिजन चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. यात महिन्याला ५० पेक्षा जास्त शिक्षकांच्या मदतीने आरोग्य विभाग आपली जबाबदारी पार पाडत आहे. पुन्हा पुढील महिन्याला नवीन ५० पेक्षा जास्त शिक्षकांची टीम या कार्यात सहभाग घेते. या माध्यमातून आरोग्य व्यवस्थेला मदतीचा ऑक्सिजन देण्याचे काम शिक्षण विभाग कोविडच्या काळात अविरतपणे करत आहे. या कार्यात डी. ए. धनगर, भुपेंद्र पाटील, समाधान पाटील, उमाकांत हिरे, हेमंत महाजन, प्रथमेश पाटील, श्री. गावित, आशिष छाजेड, श्री. शेलकर, एस. आर. शिंगाणे, आर. बी. शेलकर, जे. एन. करंदीकर, मधेश गावित,जे. बी. पाटील, अमित पाटील, एल. सी. बंजारा, यशोदीप पाटील, सुहास खांजोडकर, गणेश चव्हाण, राकेश साळुंखे, मुकेश पाटील तसेच इतर शिक्षक कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

सुविधा पुरविण्याची मागणी

मागील काही दिवसांत मुख्यतः शिक्षक कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण वाढलेले होते. यात काही शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले. यामुळे सर्वेक्षणाच्या कामात असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्याची मागणी कर्मचारी यांनी केलेली आहे. यात पीपीइ कीट, एन-९५, मास्क, ग्लोस, सॅनिटायझर तसेच काम करत असताना कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यावर देखील उपाययोजना तत्काळ मिळावी.

संपादन- भूषण श्रीखंडे