
शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटविला. शिक्षकाची चौथी पिढी निर्माण करण्याचे पवित्र कार्य त्यांनी केले. त्यांच्या कार्याचा वसा त्यांचे दोन्ही मुले जयेशकुमार काटे व उमेश काटे हे नावलौकिकाने चालवीत आहेत.
अमळनेर (जळगाव) : ‘देणाऱ्याने देत जावे... घेणाऱ्याने घेत जावे... घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत...’ या काव्यपंक्तीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कृतीतून कोळपिंप्रीच्या काटे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून एक आदर्श घालून दिला. पारंपरिक गोष्टीला तिलांजली देत बदलत्या काळात एक नवीन पायंडा पाडला आहे.
येथील फ्रूटसेल सोसायटीचे संचालक तथा ग्रामविकास शिक्षण संस्थेचे माजी संचालक प्रतापराव राजाराम काटे यांचे नुकतेच निधन झाले. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया असतो, त्यांच्या आयुष्याची इमारत मजबूत असते, याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांचे होते. एक आदर्श शिक्षक, आदर्श व कुशल कुटुंबप्रमुख, कर्तव्यपरायण नागरिक, आदर्श पिता या जबाबदाऱ्या लीलया पार पाडल्या. एकूण आयुष्याची ३७ वर्षे शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य केले. ‘एकीचे बळ मिळते फळ’ या उक्तीनुसार एकत्र कुटुंब कसे असावे, याचे जिवंत उदाहरण त्यांनी घालून दिले. शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटविला. शिक्षकाची चौथी पिढी निर्माण करण्याचे पवित्र कार्य त्यांनी केले. त्यांच्या कार्याचा वसा त्यांचे दोन्ही मुले जयेशकुमार काटे व उमेश काटे हे नावलौकिकाने चालवीत आहेत. दरम्यान, प्रतापराव यांनी अमळनेरला खासगी दवाखान्यात ३४ दिवस मृत्यूशी झुंज दिली.
कृतीतून आदर्श!
‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’ हा विचार ते आपल्या कृतीतून जगत होते, म्हणूनच आपल्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी एक आदर्श घालून दिला. त्यांचा दशक्रिया विधी, उत्तरकार्य व गंधमुक्तीचा कार्यक्रम साध्या पद्धतीने केला. कोणताही खर्च न करता काटे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुमारे एकवीस हजारांचा मदतीचा धनादेश दिला. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी सांगितले, की काटे परिवाराने बदलत्या काळात एक नवीन पायंडा पाडला आहे. या वेळी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. एम. आर. काटे, किशोर सोनवणे, यशोदीप सोनवणे, पत्रकार भूपेंद्र पाटील, स्थानिक स्कूल कमिटीचे माजी चेअरमन कांतिलाल काटे, पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत काटे, शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, ‘सकाळ'चे तालुका बातमीदार तथा शिवशाही फाउंडेशनचे सचिव उमेश काटे आदी उपस्थित होते.