esakal | अमळनेरला वृक्षसंवर्धनाचा "बिहार पॅटर्न' 
sakal

बोलून बातमी शोधा

tree plantation

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड होऊन त्यांचे संगोपन होणे गरजेचे आहे. यासाठी तालुक्‍यात दोन लाखांचे उद्दिष्ट पावसाळ्याअखेर पूर्ण करणार आहोत. यातून अनेकांना रोजगारही मिळणार आहे. तालुक्‍यातील शेतकरी व ग्रामपंचायतींनी विधायक कार्यात सहभागी व्हावे. 
-संदीप वायाळ, प्रभारी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर 

अमळनेरला वृक्षसंवर्धनाचा "बिहार पॅटर्न' 

sakal_logo
By
योगेश महाजन

अमळनेर : "वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग शंभर टक्के सार्थ ठरविण्याचा प्रयत्न तालुक्‍यात सुरू आहे. प्रभारी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या संकल्पनेतून वृक्षसंवर्धनाचा "बिहार पॅटर्न' तालुक्‍यात राबविण्यात येत आहे. पावसाळ्याअखेर दोन लाखांचे उद्दिष्ट असून, चार हजार कुटुंबांना यातून रोजगार मिळणार आहे. 
दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, यासाठी "झाडे लावा- झाडे जगवा' याशिवाय पर्याय नाही. या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात पंचायत समितीच्या माध्यमातून अमळनेर तालुक्‍यात दोन लाख वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प संदीप वायाळ यांनी केला आहे. या कार्यास प्रारंभ झाला असून, ग्रामपंचायतींवर जबाबदारी दिली आहे. जवखेडा, आर्डी- आनोरे, बोदर्डे, पतोंडा पिंपळी प्र. ज., चौबारी आदी गावांमध्ये कामांना सुरवातही झाली आहे. 

...असा आहे पॅटर्न 
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीने सार्वजनिक जागेवर 200 झाडे लावावीत. यासाठी तीन वर्षांपर्यंत चार मजुरांना 238 रुपयांप्रमाणे मजुरी मिळेल. एखाद्या शेतकऱ्याने शेताच्या बांधावर झाड जगविल्यास त्यांनाही याचा लाभ घेता येणार आहे. या योजनेची सुरवात बिहारमधून झाल्याने यास "बिहार पॅटर्न' म्हटले जाते. वृक्षारोपण झाल्यानंतर ऑक्‍टोबरपासून मजुरांना रोजगार मिळणार आहे. 

ग्रामपंचायतींचा प्रतिसाद 
पर्यावरणाचा "बिहार पॅटर्न' यशस्वी करण्यासाठी तालुक्‍यातील ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. अनेकांनी वृक्षारोपण करून संवर्धनाची जबादारी स्वीकारली आहे. कोरोनाकाळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने या योजनेतून रोजगार मिळविण्यासाठी अनेकांनी सहभाग घेतला आहे. 


 

loading image