अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना दिले मोबाईल 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

भडगाव शहरातील गुरुवर्य श्री गणेश लक्ष्मण पूर्णपात्री प्रतिष्ठानतर्फे येथील बाजार चौकातील प्रतीक्षा व निशांत ततार या बहीण, भावांना अभ्यासासाठी अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध करून दिल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. 

भडगाव (जळगाव) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था मदतीचा हात देत आहेत. भडगाव शहरातील गुरुवर्य श्री गणेश लक्ष्मण पूर्णपात्री प्रतिष्ठानतर्फे येथील बाजार चौकातील प्रतीक्षा व निशांत ततार या बहीण, भावांना अभ्यासासाठी अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध करून दिल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. 
निशांत हा बारावी विज्ञान शाखेत तर प्रतीक्षा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विज्ञान शाखेत पदवुत्तर शिक्षण घेत आहे . या मोबाईल उपलब्धतेमुळे आमचे शैक्षणिक नुकसान होणार नाही व आम्हाला मिळालेल्या मदतीचा आम्ही सदुपयोग करू, अशी भावना प्रतीक्षा हिने व्यक्त केली. प्रतिष्ठानतर्फे दोन्ही भावंडाना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 

वेळोवेळी मदत
प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी अशा प्रकारची विविध विद्यार्थी, संस्था, गरजू व्यक्तींना मदत केली जाते. या वर्षी समतोल फाउंडेशन (ठाणे) यांना रुपये पाच हजार १००, सार्थक सेवा संघ (पुणे) यांना रुपये ५ हजार १००, वयम, जव्हार यांना रुपये ५ हजार १००, आरंभ स्वमग्न आणि गतिमंद मुलांची संस्था (औरंगाबाद) यांना रुपये ५ हजार १००, सोहम ट्रस्ट (पुणे) यांना रुपये ५ हजार १०० मदत करण्यात आली. कोरोना काळात माऊली फाउंडेशन (भडगाव) या संस्थेमार्फत गरीब कुटुंबाना रुपये ६ हजाराचा किराणा वाटप करण्यात आला. तर बळिराम भंगाळे या व्यक्तीला रुपये ५ हजाराची गंभीर आजारात मदत करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon mobile distrybute in student study