शाळाबंदीवर प्रेरणादायी तोडगा; विद्यार्थ्यांना मिळतेय ‘पाकिटातून शिक्षण' 

सुधाकर पाटील 
Thursday, 17 September 2020

दररोजचा अभ्यास करून ठरलेल्या शिक्षणदुताकडे ते पाकीट विद्यार्थी जमा करतात. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना अभ्यासाचा नवा हुरूप आलाय. 

भडगाव : अंचळगाव तांडा (ता. भडगाव) येथील जिल्हा परिषद शाळेने कोरोनामुळे शाळा बंद असली, तरी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ‘पाकिटातून शिक्षण’ हा उपक्रम राबवून शाळाबंदीवर उतारा शोधला आहे. त्यांचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्याध्यापक सुरेंद्र बोरसे यांनी ‘पाकिटातून शिक्षण’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला. त्या पाकिटातून त्यांनी आपल्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नावाचे पाकीट देत त्यात अभ्यासाच्या सराव मालिका घरपोच देणे सुरू केले आहे. दररोज गावातील वेगवेगळ्या शिक्षणदुतांमार्फत पाकिटातील सराव संच विद्यार्थ्यांना घरपोच मिळतात. त्यातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, भाषा, परिसर, कला आदी सर्व विषयांचा स्वाध्याय विद्यार्थी उत्सुकतेने सोडवतात. आपल्या नावाचे पाकीट आज कोण आणतंय, याची विद्यार्थी उत्सुकतेने वाट पाहतात. दररोजचा अभ्यास करून ठरलेल्या शिक्षणदुताकडे ते पाकीट विद्यार्थी जमा करतात. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना अभ्यासाचा नवा हुरूप आलाय, असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र राठोड यांनी सांगितले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात पूर्णपणे शाळा बंद आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व अभ्यासक्रम मंडळाच्या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्हॉटसअॅप, दीक्षा अॅप, टिलीमिली कार्यक्रम यांद्वारे ‘ऑनलाइन’ शिक्षण सुरू आहे. परंतु, ग्रामीण भागातील अँड्राईड मोबाईलची मर्यादा लक्षात घेता शंभर बालकांपर्यंत शिक्षण पोचत नाही. हे लक्षात घेऊन शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी ‘ऑफलाईन’ शिक्षण देणे सुरू केले. त्यात सर्व शासकीय नियमांचे पालन करीत गटागटाने झाडाखालची शाळा, पारावरची शाळा, ओट्यावरची शाळा सुरू केली. सर्वच वर्गाच्या बालकांना यात समाविष्ट केले व शंभर टक्के बालकांचे शिक्षण सुरू ठेवले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षण समिती सदस्य व पालकांचे सहकार्य लाभत आहे. 

पाकिटातून शिक्षण या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दररोज त्यांना या पाकिटाची उत्सुकता लागलेली असते. 
-सुरेंद्र बोरसे, 
मुख्याध्यापक, जि. प. शाळा अंचळगाव तांडा (ता.भडगाव)  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon teachers came up with a solution to the school ban and gave education to the students from tandya from their pockets