अरे व्वा जळगाव जिल्ह्यातील दहा प्रकल्पे ओव्हरफ्लो !

सुधाकर पाटील 
Saturday, 19 September 2020

जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेतीसाठीही पाणी मिळणार आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात रब्बी हंगाम बहरणार आहे.

भडगाव ः यंदा आतापर्यंत दमदार पाऊस झाल्याने जळगाव जिल्ह्यातील तीन मोठे व १३ मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेने तब्बल आठ टक्के अधिक साठा आहे. गेल्या वर्षी ४२.२६ (८३.८३ टक्के) टीएमसी पाणीसाठा होता. सद्यःस्थितीला या प्रकल्पांमध्ये एकूण ४६.४६ टीएमसी (९२.१७ टक्के) उपयुक्त जलसाठा आहे. यात दोन मोठे प्रकल्प व आठ मध्यम प्रकल्प १०० टक्के भरून ओसंडून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगाम चांगलाच बहरणार आहे. 

जळगाव जिल्ह्यातील तीन मोठे व १३ मध्यम प्रकल्पांची एकूण क्षमता एक हजार ४२७ दलघमी म्हणजेच ५० टीएमसी आहे. सद्यःस्थितीला या प्रकल्पांमध्ये एकूण १,३१५ दलघमी अर्थात ४६.४६ टीएमसी उपयुक्त जलसाठा आहे. 

अभोरा, मंगरूळ, सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, मन्याड, बोरी, गिरणा व वाघूर धरण ओव्हरफ्लो झाले असून, हतनूरमधे ७६ टक्के साठा आहे. त्यातून पाण्याच्या आवकमुळे विसर्ग सुरू आहे, तर मोर व बहुळा मध्यम प्रकल्प ९० टक्क्यांच्या वर साठा आहे. 

पाणीटंचाईचे संकट दूर 
यंदा जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. निम्म्या जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात १०० टक्के साठा होऊन पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव शहरांसह १५८ ग्रामीण पाणीयोजनांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. वाघूर धरणातही १०० टक्के साठा असल्याने जळगाव शहरावरील टंचाईचे संकट दूर झाले आहे. 

रब्बी हंगाम बहरणार 
जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेतीसाठीही पाणी मिळणार आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात रब्बी हंगाम बहरणार आहे. एकट्या गिरणा धरणातून ५७ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. इतर छोट्या प्रकल्पांतून हजारो हेक्टर जमीन भिजते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

जिल्ह्यातील प्रकल्पातील गत वर्षाचा व सद्यःस्थितील पाणीसाठा दलघमीमध्ये 
प्रकल्प एकूण क्षमता सद्यःस्थितीचा गत वर्षाचा 
दलघमी टक्केवारीत 
हतनूर ......... २५५ ..... ७५.७३ ......... ६२.७२ 
गिरणा ........ ५२३ ..... १०० ............. ९९.४५ 
वाघूर ...... २४८.५ .... १०० ............ ८०.१४ 
अभोरा ....... ६.२ ..... १०० .............. १०० 
मंगरूळ ...... ६.४१ ..... १०० .............. १०० 
सुकी ....... ३९.८५ ..... १०० .............. १०० 
मोर ........ ७.९३ ...... ९२.२ ............. ९४.६९ 
अग्नावती ... २.७६ ........ १०० ............... ०.७९ 
हिवरा ..... ९.६० ......... १०० .............. १०० 
बहुळा ..... १६.३३ ........ ९७.८८ .......... ९३.८९ 
तोंडापूर .... ४.६४ ........... १०० ........... १०० 
अंजनी ..... १५.६२ ......... ८२.७४ ......... ९४.६७ 
गूळ ....... २२.७६ ......... ७६.३२ ........ ७५.३५ 
भोकरबारी ... ६.५४ ........... २२.४२ ......... ०० 
बोरी ...... २५.१ .... १०० ................ १०० 
मन्याड ...... ४० ..... १०० ................. ००  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon ten dams in the district overflow so crop production will be better this year