
शहर पोलिसांनाही माहिती कळवल्यानंतर त्यांची काही मिनिटात धाव घेतली मात्र याचवेळी चोरटे पळाले, चोरटे पळाले असा गोंधळ सुरू झाला.
भुसावळ : घरात चोरट्यांनी धुमाकूळ माजवत चोरी सुरू केलेली असताना शेजारच्यांसह संपूर्ण कॉलनीतील लोक चोरट्यांना पकडण्यासाठी एकवटले तर नेहमीच उशिराने येणार्या पोलिसांनी मात्र अवघ्या काही मिनिटात घेतलेली धावही कुचकामी ठरली. अगदी एखाद्या सिनेमाचे कथानक असावे अशीच घटना शहरातील शांती नगर परीसरातील सोमाणी गार्डन परीसरात बुधवारी (ता. 18) मध्यरात्री घडली.
आवश्य वाचा- प्रेमीयुगल चौपाटीवर आले फिरायला; पण त्यांच्यावर बेतला वाईट प्रसंग
चोर पळाले... चोर पळाले म्हणत घोळका नागरीकांच्या आवाजाच्या दिशेने धावताच चोरट्यांनी पोलिस व नागरीकांच्या हातावर तुरी देत पळ काढला. या घटनेत चोरट्यांनी सुमारे आठ ते दहा ग्रॅम वजनाचे दागिने लांबवल्याचे समजते मात्र तक्रारदाराने बुधवारी रात्री उशिरापर्यंत तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागरीकांच्या वेढ्यानंतरही चोरटे पसार
शहरातील शांती नगरातील सोमाणी गार्डन परीसरातील रहिवासी बोदवड पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी दिनेश झोपे राहतात. रूईखेडा येथे ते गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. दर्शनी भागाच्या दरवाजाचे कुलूप तोडताना कडी-कोयंडा भिंतीतून निखळल्याने जोरदार आवाजाने शेजारी राहणारे बापू पाटील यांना जाग आली. बुधवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर चोरट्यांनी मुद्देमालाचा शोधाशोध करताना सामानाची फेकाफेक केली. कपाटात असलेले सोन्याचे 7 ते 8 ग्रॅमचे दागिणे मिळाल्यानंतर चोरटे पळ काढणार तो कॉलनीतील लोक मोठ्या प्रमाणावर जमले तर शहर पोलिसांनाही माहिती कळवल्यानंतर त्यांची काही मिनिटात धाव घेतली मात्र याचवेळी चोरटे पळाले, चोरटे पळाले असा गोंधळ सुरू झाल्याने घोळका आवाजाच्या दिशेने जात असताना चोरट्यांनी पोलिस व नागरीकांच्या हातावर तुरी देत पळ काढला. रात्री या परिसरातील माजी नगरसेवक शेखर इंगळे, अॅड.चरणसिंग, प्रकाश जोशी, प्रदीप जोशी, बापू पाटील, अजीत सरोदे, ऋषी पाटील, रूपम सरोदे, यशवंत भोळे, श्रेयस इंगळे आदींसह कॉलनीतील नागरीकांनी धाव घेतली होती.
वाचा- जळगाव शहरात रस्ते दुरुस्तीचा सोमवार पासून 'श्री गणेशा'!
दागिने घेवून चोरटे पसार
दिनेश झोपे यांना बुधवारी रात्रीच चोरीची माहिती कळवल्यानंतर ते रूईखेडा, ता.मुक्ताईनगर येथून बुधवारी पहाटेच 2.30 वाजता घरी पोहोचल्यानंतर त्यांनी चोरी झालेल्या वस्तूंची पाहणी केली तसेच अस्ताव्यस फेकलेले साहित्य आवरले. बुधवारी दिवसभरात चोरट्यांनी दरवाजा उघडताना भिंतीचे प्लॅस्टर निखळले असल्याने त्याची डागडूजीदेखील करण्यात आली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे म्हणाले की, संबंधित तक्रारदार अद्याप पोलिस ठाण्यात आले नसल्याने गुन्हा दाखल झालेला नाही.
संपादन- भूषण श्रीखंडे