esakal | भुसावळ पालिकेत खडसे गटाचा वरचष्मा, प्रमोद नेमाडे बिनविरोध

बोलून बातमी शोधा

भुसावळ पालिकेत खडसे गटाचा वरचष्मा, प्रमोद नेमाडे बिनविरोध
भुसावळ पालिकेत खडसे गटाचा वरचष्मा, प्रमोद नेमाडे बिनविरोध
sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ : भुसावळ पालिकेचे उपनगराध्यक्ष रमेश नागराणी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रीक्त जागेवर गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक झाली. प्रमोद नेमाडे व पिंटू ठाकूर यांनी या पदासाठी अर्ज घेतला असला तरी निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरल्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत नगरसेवक प्रमोद नेमाडे यांनी अर्ज सादर केल्याने त्यांची निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार दीपक धीवरे यांनी बिनविरोध निवड केली. यावेळी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व नगराध्यक्ष रमण भोळे उपस्थित होते.

माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपात असताना उपनगराध्यक्ष पदासाठी ठरल्याप्रमाणे प्रत्येकी दोन महिन्यांचा कार्यकाळ नगरसेवकांसाठी निश्‍चित करण्यात आला असलातरी माजी मंत्री खडसेंनी भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पालिकेतील राजकीय गणितेही बदलली. आधी समर्थक युवराज लोणारी, लक्ष्मी मकासरे, शेख सईदा शफी, रमेश नागराणी या चौघांना संधी मिळाली असलीतरी केवळ युवराज लोणारी या आमदार समर्थकांव्यतिरीक्त नंतरच्या काळात सत्ताधारी भाजपातील मात्र आमदार समर्थकांपैकी कुणालाही उपनगराध्यक्ष पदावर संधी मिळाली नाही.

पिंटू कोठारींचा समाजकारणावर भर
नागराणी यांच्यानंतर खरे तर पिंटू कोठारी व प्रा.दिनेश राठी हे दावेदार होते मात्र प्रा.राठी यांना आरोग्य सभापतीपदाची संधी मिळाल्याने ते स्पर्धेबाहेर होते तर कोठारींनी पद बाजूला सारत समाजकारण करण्यावर भर दिल्याने सोनी संतोष बारसे या पदाच्या हक्कदार होत्या. मात्र सामाजिक मतांचा प्रभाव पाहता प्रमोद नेमाडे यांना ऐनवेळी संधी देण्याचे नियोजन करण्यात आल्याने लेवा समाजाला पुन्हा संधी देण्यात आली.

भाजप समर्थकांना सारले बाजूला
चारही उपनगराध्यक्षांमध्ये सर्वच समाजाला न्याय देण्याचा प्रयत्नही यातून दिसून आला. तर भाजपा समर्थक गटातील सदस्यांना मात्र पद्धतशीरपणे दूर ठेवण्याची खेळी देखील यशस्वी झाली. त्यामुळे आगामी राजकारण कोणत्या दिशेने असेल? हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यानंतर आगामी काळात उपनगराध्यक्षपदावर कोण विराजमान होईल हे आगामी काळातील मतांच्या धुव्रीकरणासाठी सोयीतील राजकारणच ठरवणार आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे