भुसावळच्या ‘अमृत’ला मिळणार नवसंजीवनी !

चेतन चौधरी 
Tuesday, 1 September 2020

योजनेची मुदत दोन वर्षांची असली, तरी मुदत संपून एक वर्ष उलटले तरी अद्याप याचे काम पूर्णत्वास आलेले नाही. यात योजनेतील २१३ किलोमीटरपैकी १४० किलोमीटरच्या जलवाहिनीचे काम झालेले आहे.

भुसावळ  : भुसावळ शहरातील सध्या अडगळीत पडलेल्या, तसेच मुदत संपूनही पूर्णत्वाला न आलेल्या अमृत योजनेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठबळाने नवसंजीवनी मिळणार आहे. मूळ ९० कोटींच्या या योजनेच्या १५८ कोटी रुपयांच्या नवीन सुधारित आराखड्याला मंजुरी देणार असल्याची माहिती सोमवारी (ता. ३१) पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत दिली. 

भुसावळ शहरात अमृत योजनेचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असून, नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठादेखील करण्यात येत नाही. या समस्येची गंभीर दखल पालकमंत्री पाटील यांनी घेतली आहे. या अनुषंगाने त्यांनी सोमवारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. यात या योजनेच्या कार्यान्वयाबाबत सविस्तर उहापोह करण्यात आला. 

...अशी आहे योजनेची सद्य:स्थिती 
भुसावळ शहरात २२ मे २०१७ ला ९० कोटी ८४ लाख ५१ हजार रुपयांच्या अमृत योजनेला मान्यता देण्यात आली. यानंतर २६ ऑक्टोबर २०१७ ला जैन इरिगेशनला वर्कऑर्डर देण्यात आली. या योजनेची मुदत दोन वर्षांची असली, तरी मुदत संपून एक वर्ष उलटले तरी अद्याप याचे काम पूर्णत्वास आलेले नाही. यात योजनेतील २१३ किलोमीटरपैकी १४० किलोमीटरच्या जलवाहिनीचे काम झालेले आहे. तर पाण्याच्या ११ टाक्यांपैकी नऊ टाक्यांचे काम सुरू झालेले आहे. 

स्रोत बदलला 
शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर असले तरी कोविड-१९चा प्रादुर्भाव आणि नंतर पावसाळ्यामुळे वितरणव्यवस्था व रस्त्यांची कामे खोळंबली आहेत. या आधी पाण्याचा स्रोत हा शहरातील तापी नदीच्या पात्रात होता. हा स्रोत बदलून शेळगाव बंधाऱ्याच्या वरील भागात साकेगाव शिवारात घेण्यात आला असून, यासाठी मजिप्रा नाशिक येथे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

यांची होती उपस्थिती 
बैठकीला आमदार संजय सावकारे, आमदार अनिल भाईदास पाटील, नगरसेवक मनोज बियाणी, ‘मजिप्रा’चे अभियंता निकम, भुसावळचे मुख्याधिकारी संदीप चंद्रवार, प्रकल्प अभियंता वाघ, जैन इरिगेशनचे अधिकारी श्री. भिरूड आणि श्री. ललवाणी आदींची उपस्थिती होती. 

मक्तेदाराला निर्देश 
या पार्श्‍वभूमीवर आजच्या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे ९० कोटींऐवजी सुधारित १५८ कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अमृतच्या मूळ योजनेचे काम येत्या मार्चअखेरीस पूर्णत्वाकडे येऊन नंतर सुधारित कामास प्रारंभ करण्यात येईल, असे या बैठकीत ठरविण्यात आले. यात जानेवारी २०२१ पर्यंत वितरणव्यवस्थेचे काम पूर्ण करावे आणि आठ जलकुंभ हे मार्च २०२१, तर तीन जलकुंभ हे जुलै २०२१ अखेरीस पूर्ण करावे, असे निर्देश जैन इरिगेशनला या बैठकीत देण्यात आले. परिणामी, अमृत योजनेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठबळाने व आमदार संजय सावकारे यांच्या पुढाकाराने नवसंजीवनी मिळणार आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal government approved the revised proposal for the work of Amrut Yojana