आहो काय सांगतात...चक्क नगरसेवक विकणार किडणी; कुठे, कशासाठी ! मग वाचा...

चेतन चौधरी 
सोमवार, 13 जुलै 2020

रस्‍त्‍यांसाठी आलेला शासनाकडील निधी परत गेला. नगराध्‍यक्षांच्‍या निष्‍क्रियतेमुळे जनतेच्‍या कामांसाठी आलेला निधी परत जात आहे.

भुसावळ : नगरपरिषदेच्‍या निवडणुकीत मतदारांना दिलेल्‍या वचननाम्‍यानुसार प्रभागातील कामे नगरसेवकांना करावयाची होती. मात्र, कामे होत नसल्‍याने किडणी विकून कामे करण्‍याचा निर्धार प्रभाग क्रमांक २० मधील भाजप नगरसेवक महेंद्रसिंग(पिंटू) ठाकूर यांनी केला आहे. 

चार वर्षांपासून प्रभागातील नागरिकांना शुद्ध पाणी, रस्‍त्‍यांसाठी नगरपरिषद प्रशासन व नगराध्‍यक्षांशी वारंवार चर्चा केली. लेखी निवेदन देऊन विषय सभेतही मांडले. तरीही विषय सर्वसाधारण सभेच्‍या अजेंड्‍यावर घेतले नाही. नगरपरिषदेची सभा घेण्‍यास प्रशासन व नगराध्‍यक्ष टाळाटाळ करीत आहे. रस्‍त्‍यांसाठी आलेला शासनाकडील निधी परत गेला. नगराध्‍यक्षांच्‍या निष्‍क्रियतेमुळे जनतेच्‍या कामांसाठी आलेला निधी परत जात आहे. नियोजन शून्‍य कारभार असून, कुठल्‍याही प्रश्‍नांची दखल घेतली जात नसल्‍याने मी माझी किडणी विकून प्रभागातील डांबरीकरण, ट्रीमीक्‍स काँक्रीट, पेव्‍हर ब्‍लॉक रस्‍ते व शुद्ध पाण्‍यासाठी विविध ठिकाणी आरओ प्लाँट लावून जनतेला शुद्ध पाणी देण्‍याचा प्रयत्‍न राहील. माझ्‍या प्रभागात ही कामे जो करून देईल, त्‍या मोबदल्‍यात मी एक किडणी देण्‍यास तयार असून गरजूंनी संपर्क साधावा, असे सरळ आवाहन नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी पत्रकान्‍वये करून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे. 

प्रभागातील कामासंदर्भात नगराध्यक्षांना भेटून सांगितले असता, ते फक्त हो म्हणतात, करू पाहू असे सांगून वेळ काढून नेतात. पालकमंत्र्यांनी प्रस्ताव पाठवण्यास सांगितले, मात्र तोदेखील पाठवत नाही. त्यामुळे रस्त्याचे काम होत नाही. आत्तापर्यंत स्वखर्चाने वॉर्डातील विविध कामे केली आहेत. 
महेंद्रसिंग ठाकूर, भाजप नगरसेवक
 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal Kidney to be sold by corporator development work in the ward