भाजपच्या खासदार रक्षा खडसे- चंद्रकांत पाटील यांच्यात स्‍टेजवरच जुंपली

अमोल आमोदकर
Thursday, 19 November 2020

बोदवड येथील सीसीआय केंद्राचे उद्‌घाटन व कापूस खरेदी शुभारंभ कार्यक्रमासाठी खासदार रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, सदर कार्यक्रमाला येण्यास आमदार चंद्रकांत पाटील यांना उशीर झाला.

भुसावळ (जळगाव) : रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात एका कार्यक्रमात स्‍टेजवरच बाचाबाची झाली. बोदवड येथे सीसीआय केंद्राचे उद्‌घाटन व कापूस खरेदी शुभारंभ कार्यक्रमादरम्‍यान हा प्रकार घडला.

बोदवड येथील सीसीआय केंद्राचे उद्‌घाटन व कापूस खरेदी शुभारंभ कार्यक्रमासाठी खासदार रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, सदर कार्यक्रमाला येण्यास आमदार चंद्रकांत पाटील यांना उशीर झाला. त्यामुळे खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आमदार पाटील यांना त्याचा राग आहे. उद्‌घाटन कार्यक्रमास थोडे थांबता आले नाही का? असे म्हणत त्‍यांनी स्‍टेजवरच संताप व्यक्त केला. यावर खासदार खडसे यांनी कार्यक्रमाची वेळी सकाळी दहा वाजेची होती. वाट पाहूनच मग कार्यक्रम घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा खासदार रक्षा खडसेंवर पलटवार केला. मला आधी सांगितले असते तर तुम्हीच घेतला असता कार्यक्रम, असं सांगत आमदार चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावला.

खडसे- पाटील कट्टर विरोधक
ज्‍येष्‍ठ नेते एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. एकमेकांविरोधात त्‍यांनी अनेकदा निवडणूका लढविल्‍या असून यात एकनाथ खडसे यांनी विजय मिळविला. मात्र खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचा आमदार चंद्रकांत पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव केला होता.

मग चंद्रकांत पाटील झाले नाराज
भाजपला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यात चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे कट्टर समर्थक मानले जातात. सध्या राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार असून खडसेंच्या प्रवेशावेळी विश्वासात न घेतल्याने मुक्ताईनगरचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील नाराज झाले आहेत. मुक्ताईनगर येथील निवडणूक लढून ते विजयी झाले होते. एकनाथ खडसे यांच्या मुलीला हरवून विजयी झालो आहे आणि महाविकास आघाडीत असतानाही खडसे यांना प्रवेश देताना मला विचारात घेतले नाही; त्यामुळे पाटील हे नाराज आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal mp raksha khadse and mla chandrakant patil on stage suit in programe