भाजप नगरसेवकाच्या जुगारअड्ड्यावर छापा 

चेतन चौधरी 
Tuesday, 15 December 2020

कारवाईनंतर अटकेतील संशयितांना शासकीय विश्रामगृहातील एका कक्षात बसविण्यात आले. तेथे कुणालाही जाण्यास मनाई करण्यात आली.

भुसावळ : शहरातील जामनेर रोड भागात सोमवारी एकाचवेळी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध धंद्यांवर छापे टाकत नऊ संशयितांच्या मुसक्या आवळत ५२ हजार ८० रुपयांच्या रोकडसह सट्टा जुगाराची साधने जप्त केली. काही संशयित फरारी झाले असून, संशयितांविरुद्ध बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. विशेष म्हणजे, यात भाजप नगरसेवकाच्या जुगारअड्ड्यावर झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. 

आवश्य वाचा- जळगावचे जिल्हा रुग्णालय टाकतेय ‘कात’ -

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील जामनेर रोडवर एकाच वेळी सट्टा, जुगारअड्ड्यांवर कारवाई करीत नऊ जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून सट्टा, जुगाराची साधने, तसेच ५२ हजार ८० रुपयांची रोकड जप्त केली. यात पहिली कारवाई नाहाटा चौफुली, दीनदयालनगराजवळून संशयित कृष्णा महालेकर (रा. नेब कॉलनी, भुसावळ) व संदीप अशोक चौधरी (दीनदयालनगर, भुसावळ) याच्या ताब्यातून १४ हजार ५०० रुपयांची रोख व सट्टा व जुगाराची साधने जप्त करण्यात आली. दुसरी कारवाई अष्टभूजा मंदिर परिसरात करण्यात आली. चार हजार १८० रुपयांच्या रोकडसह संशयित रवींद्र रामदास वारके (हनुमाननगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली. तिसरी कारवाई सोनिच्छावाडीजवळ कृष्णानगरात करण्यात आली. संशयित संतोषलाल गिरीलाल (खडका रोड, भुसावळ) व गोपाल द्वारकादास अग्रवाल (शनिमंदिर वॉर्ड, भुसावळ) यांच्या ताब्यातून दहा हजार ९८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. चौथी कारवाई सोनिच्छावाडीजवळील चहा टपरीजवळ करण्यात आली. संशयित आरोपी प्रल्हाद हरी सपकाळे (दीनदयालनगर, भुसावळ) व छोटेलाल ब्रिजलाल (गांधीनगर, भुसावळ) यांच्या ताब्यातून दहा हजार ९२० रुपयांची रोकड व सट्टा-जुगाराची साधने जप्त करण्यात आली. पाचवी कारवाई सोनिच्छावाडी नगरजवळ करण्यात आली. संशयित संतोष शंकर तायडे (तुळशीनगर, भुसावळ) व मारोती वेडू भालेराव (शिवपूर कन्हाळा, भुसावळ) यांच्या ताब्यातून ११ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. 

 

...यांच्या पथकाची कारवाई 
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक महाजन, शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव, तसेच रवी नरवाडे, रमेश चौधरी, अनिल इंगळे, शरद भालेराव, दादाभाऊ पाटील, संतोष मायकल, इद्रिस पठाण यांच्या पथकाने केली. 

 

शासकीय विश्रामगृहात कागदपत्रांची पूर्तता 
सोमवारी दुपारी दोन ते रात्री सातपर्यंत सुरू असलेल्या कारवाईनंतर अटकेतील संशयितांना शासकीय विश्रामगृहातील एका कक्षात बसविण्यात आले. तेथे कुणालाही जाण्यास मनाई करण्यात आली. पाचही कारवायांची स्वतंत्र फिर्याद तयार करण्यात आल्यानंतर बाजारपेठ पोलिस ठाण्यात स्वतंत्र पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. शहरातील एकाच भागात झालेल्या कारवाईने मात्र आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. 

वाचा- घरात लग्नाची तयारी सुरू आणि वधू घरातील पैसे घेवून पसार -

नगरसेवक पिंटू कोठारीचे नाव 
शहरातील अष्टभूजा मंदिरासमोर असलेल्या रिक्षा थांब्याच्या आडोशाला मालक निर्मल ऊर्फ पिंटू रमेशचंद्र कोठारी (रा. भुसावळ) हा स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा हस्तक रवींद्र रामदास वारके (वय ५४, रा. हनुमाननगर, पंचवटी मंदिराजवळ भुसावळ) याच्यामार्फत सट्ट्याची बिट अंकावर पैसे स्वीकारून कल्याण मटका व मिलन डे नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळताना व खेळविताना आढळून आला. निर्मल ऊर्फ पिंटू कोठारी भाजपचा नगरसेवक आहे. या प्रकरणी संशयितांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे रमेश चौधरी यांनी फिर्याद दाखल केली आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal police raid bhusawal BJP corporator's gambling den