पुलावरून नदीत उडी; तरूणाच्या खिशातील चिठ्ठीने केला उलगडा

चेतन चौधरी
Monday, 26 October 2020

अंगात टी- शर्ट व दाढी ठेवलेल्या या तरुण संदर्भात पोलीस ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याला नदीतून बाहेर काढण्यात आले. शहर पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले.

भुसावळ (जळगाव) : येथील तापी नदी पुलावरून एका तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटना आज (ता. 26) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. मात्र घटना कोणत्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली; यावरून शहर पोलीस स्टेशन व फैजपूर पोलीस स्टेशन यांच्यात तब्बल तीन तास घोळ सुरू होता. तर मयताच्या खिशातून निघालेल्‍या चिट्ठीवरून प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

आत्महत्या केलेल्या तरुणाच्या हातावर प्रशांत लिहिले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर अंगात टी- शर्ट व दाढी ठेवलेल्या या तरुण संदर्भात पोलीस ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याला नदीतून बाहेर काढण्यात आले. शहर पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. मात्र रात्री उशिरापर्यंत कोणत्याही पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली नव्हती.

महिनाभरातील तिसरी घटना
तापी नदीच्या पुलावरून उडी घेवून आत्‍महत्‍या करण्याची महिनाभरातील तिसरी घटना आहे. १ ऑक्टोबरला विरेन्द्र रामा कोळी यांनी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. तर १४ ऑक्‍टोंबरला एका महिलेने उडी घेऊन आत्महत्या केली होती. ती घटना फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. तर आज पुन्हा तरुणाने तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

तीन तास वाहतूक ठप्प
घटना घडली त्यावेळी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे हे दुर्गा देवी विसर्जन बंदोबस्तात व्यस्त होते. त्यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक वैभव पेटकर, हे. कॉ. नागेंद्र तायडे, संजय पाटील, महेंद्र ठाकरे, विशाल साळुंखे, राजकिरण झाल्टे आदींनी घटनास्थळी पाठवले. या पोलिस पथकाने तब्बल तीन तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

पोलीस निरीक्षक भागवत यांची भेट
घटना कोणत्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीत असो. प्रेत बाहेर काढा अशा सूचना बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी शहर पोलीस त्यांच्या पोलिसांना दिल्या. पोलीस निरीक्षक भागवत हे दुर्गा देवी विसर्जन बंदोबस्तासाठी फिरत असताना ते घटनास्थळी आले. त्यांनी दिवस मावळत असल्यामुळे संबंधित पोलिसांना मार्गदर्शन केले. दरम्यान, नगरसेवक निर्मल कोठारी यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

पोलीस पाटील म्हणतात घटना फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत
दरम्यान, घटना घडल्यानंतर शहर पोलिसांच्या पोलिसांनी किरण वानखेडे (रा. अकलूद, ता. यावल) पोलीस पाटील यांना माहिती देत घटनास्थळी उपस्थित राहण्याचे सूचना केल्या. यावेळी त्यांनी ही घटना फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशन व फैजपूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना दिली. मात्र पुलावर २८ दगडी भिंत असल्यामुळे दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत 14 व 14 भिंती येतात; असा दावा फैजपूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी करत घटना १४ भिंतीच्या पुढे असल्यामुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे सांगितले. तर पोलीस पाटील वानखेडे यांनी मी पोलीस पाटील पदाची सुत्रे घेतली. त्या वेळेस मला फैजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १७ भिंती असल्याचे सांगण्यात आल्‍याची माहिती उपस्थितांना दिली.  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal tapi river bridge young boy suicide in love matter