रेल्वेचे तिकीट चेक करण्यासाठी मागितले; चक्क! टिसीला डांबून प्रवाश्यांकडून मारहाण

चेतन चौधरी 
Wednesday, 30 December 2020

सीटवरील जवळपास १० ते १५ प्रवाशांनी सतीशकुमार आणि धीरजकुमार यांना घेराव घातला. तसेच त्यांना मारहाण करीत त्यांना या डब्यातच घेराव करून डांबून ठेवले.

भुसावळ : रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करीत असताना संबंधित प्रवाशांनी तिकीट निरीक्षकांना घेराव घालून मारहाण केल्याची घटना लोकमान्य टिळक गोदान एक्स्प्रेसमध्ये भुसावळ स्थानकावर घडली. याबाबत रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

लोकमान्य टिळक गोदान एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १०६०) सकाळी पावणेआठच्या सुमारास रेल्वेस्थानकावरून सुटल्यानंतर गाडीमध्ये तिकीट निरीक्षक सतीशकुमार रामस्‍वरूप आणि धीरज कुमार हे प्रवाशांची तिकीट तपासणी करीत होते. या दरम्यान गाडीतील एस १० डब्यात जाऊन सीट क्रमांक ९ ते १४ वरील प्रवाशांना तिकीट यांचे विचारणा केली असता, या सीटवरील जवळपास १० ते १५ प्रवाशांनी सतीशकुमार आणि धीरजकुमार यांना घेराव घातला. तसेच त्यांना मारहाण करीत त्यांना या डब्यातच घेराव करून डांबून ठेवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी सतीशकुमार यांनी रेल्वे कंट्रोल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

 

त्या वेळी चाळीसगाव रेल्वेस्थानकावर गाडी थांबविण्यात आली. मात्र, पोलिस पथकास उशिर झाल्याने गाडी लवकर निघाली. त्यामुळे जीआरपी पथक माघारी परतले. यानंतर मनमाड रेल्वेस्थानकावर दूरध्वनीद्वारे संपर्क करून या ठिकाणी गाडी थांबविण्यात आली. तेव्हा जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांच्या पथकाने गाडीत जाऊन या तिकीट निरीक्षकांना सुखरूप बाहेर काढले. या वेळी संबंधित प्रवाशांना देखील ताब्यात घेण्यात आली असून, त्यांना मनमाड येथून भुसावळ येथे रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले आहे. 

..हे आहेत संशयित 
तिकिट निरीक्षक सतीशकुमार यांच्या फिर्यादीवरून भुसावळ रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून. आसमा शरिफा खान (मुंबई), शहबाज अली अनवर अली, मोहम्मद दिलशाद मोहम्मद वैस (सर्व रा. मुंबई) यांच्याविरुद्ध रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिल चंपतराव तपास करीत आहेत.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal train ticket checker passenger beaten