धक्कादायक : चक्क चार महिन्यापासून ट्रामा सेंटरमध्ये १० ‘व्हेटीलेटर’ धुळखात

देविदास वाणी
Saturday, 26 September 2020

भुसावळ शहर व परिसरात रोज बाधीत रुग्ण आढळत असताना ट्रॉमा सेंटरमध्ये स्थानिक प्रशासनाने व्हेंटीलेटर वापराविनाच ठेवलेले आहेत. व्हेंटीलेटर बंद खोलीत वापराविना पडून आहेत.

भुसावळ : शहरात जळगाव रोडवर सुरू झालेल्या ट्रॉमा सेंटरमध्ये १० नवीन व्हेंटीलेटर देण्यात आले आहेत. ते गेल्या चार महिन्यापासून वापराविना बंद खोलीत धुळखात पडून असल्याबाबत माजी आमदार संतोष चौधरी यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन स्थानीक आरोग्य प्रशासनाचा आळशीपणा उघडकीस आणला आहे. 

माजी आमदार चौधरींना भुसावळ व परिसरातून अनेक रुग्ण व नातेवाईकांनी फोन करून भुसावळला कोरोना बाधीतांसाठी व्हेटीलेटर उपलब्ध होत नसल्याबाबत तक्रारी केल्या होत्या. भुसावळ शहर हे कोविड विषाणूच्या संसर्गाबाबत हॉटस्पॉट आहे. येथे बाधीतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील रेल्वे हॉस्पिटल, डॉ.उल्हास पाटील रुग्णालय आदी ठिकाणी कोरोना बाधिताना व्हेंटीलेटर मिळत नसल्याबाबत मला दूरध्वनीवरून अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.

माजी आमदारांनी केली तक्रार

भुसावळ शहर व परिसरात रोज बाधीत रुग्ण आढळत असताना ट्रॉमा सेंटरमध्ये स्थानिक प्रशासनाने व्हेंटीलेटर वापराविनाच ठेवलेले आहेत. व्हेंटीलेटर बंद खोलीत वापराविना पडून आहेत. स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. पडून असलेल्या १० व्हेंटीलटर उपयोगात आणण्याबाबत स्थानिक प्रशासनाला तात्काळ आदेशीत करावे अशी मागणी घेऊन माजी आमदार चौधरींनी थेट आरोग्य मंत्री टोपे यांची भेट घेऊन सत्य उघडकीस आणले. व्हेंटीलेटर धुळखात पडून असल्याचा फोटोही त्यांनी दाखविला. आरेाग्य मंत्री टोपेंनी यावर कारवाईचे आदेश दिले. या मागणीच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पाठविल्या आहेत. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal trauma center has been without ten vinators for four months