
सर्वप्रथम तालुक्यातील बड्या व्यक्तींवर कारवाई झाल्याने अनेक महसूल बुडव्यांचे धाबे दणाणले आहे. यापुढे आणखी कोणावर कारवाईची कुऱ्हाड पडते, यावर सर्वत्र तालुक्याचे लक्ष लागून आहे.
बोदवड : तालुक्यातील कोल्हाडी गावात नागरी वस्तीमधून नियम डावलून (ब्लास्टिंग मटेरिअल) स्फोटक पदार्थांचा खुलेआम व्यापार सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांसह शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील यांनी १९ ऑगस्ट २०१९ ला जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यावर सतत पाठपुरावा सुरू ठेवल्याने अखेर सोमवारी (ता. २६) जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून संबंधित मुक्ताई एंटरप्राइजेसचा स्फोटक परवाना रद्द करण्यात आला.
आवश्य वाचा- दोन वर्षाची बालीका तिसऱ्या मजल्यावरून पडली, दैव बलवत्तर म्हणून वाचली !
मुक्ताई एंटरप्राइजेसतर्फे अतुल राणे (रा. विद्यानगर, बोदवड) यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १६ ऑगस्ट २०१२ ला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र, त्यातील अटी व शर्तींची पूर्तता न केल्यामुळे त्यांचा स्फोटकांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
नाहरकत प्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार रस्त्याच्या हद्दीपासून रस्त्यास समांतर असा १२ मीटर रुंदीचा सेवा मार्ग ठेवायला हवा; परंतु स्थळ निरीक्षण नकाशात दर्शविल्याप्रमाणे गट क्रमांक ४७ च्या उत्तरेस कोल्हाडी-निमखेड रस्ता, तर दक्षिणेस कोल्हाडी-चिंचखेडसीम शीवरस्ता असून, या रस्त्यांना जोडणारा व स्फोटक गुदामासमोर जाणारा मुरमाचा कच्चा रस्ता अंदाजे १० ते १२ फूट रुंदीचा दिसून येतो. या जागेवर अकृषक वापर करण्यापूर्वी मुक्ताई एंटरप्राइजेसचे अतुल राणे यांनी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून वाणिज्य प्रयोजनार्थ बिनशेती परवानगी व नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी घेणे आवश्यक होते; परंतु त्यांच्याकडून अटी-शर्तींची पूर्तता केली गेली नसल्याने परवाना रद्दचे आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी काढले आहेत. न्यायालयीन कामकाज ॲड. विनोद सुशीर (धनगर) यांनी पाहिले.
आणखी ‘रडार’वर
राजकीय पाठबळामुळे तालुक्यात बेकायदा धंद्यांना पाठबळ मिळाल्याने शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम तालुक्यातील बड्या व्यक्तींवर कारवाई झाल्याने अनेक महसूल बुडव्यांचे धाबे दणाणले आहे. यापुढे आणखी कोणावर कारवाईची कुऱ्हाड पडते, यावर सर्वत्र तालुक्याचे लक्ष लागून आहे.