esakal | मोगरीसाठी दोघी बहिणी उतरल्‍या पाण्यात अन्‌ त्‍यानंतर आईचा आक्रोश
sakal

बोलून बातमी शोधा

Drowned sister

पावसामुळे तलाव व खदान परिसरात पाण्याचा मोठा साठा झाला आहे. कपडे धुताधुता अचानक लाकडी मोगरी हातातून सरकून पाण्यात वाहू लागल्याने गुलनाजबी हिने ती काढण्यासाठी पुढे पाऊल टाकताच ती पाण्यात बुडू लागली.

मोगरीसाठी दोघी बहिणी उतरल्‍या पाण्यात अन्‌ त्‍यानंतर आईचा आक्रोश

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा : गावाजवळ असलेल्‍या खदाणीत आईसोबत कपडे धुण्यासाठी तीन सख्ख्या बहिणी गेल्‍या होत्‍या. यावेळी कपडे धुण्यासाठीची लाकडी मोगरी पाण्यात वाहू लागल्याने तिला काढण्यासाठी दोन बहिणींनी प्रयत्न केला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या त्यांना वाचवण्यासाठी आई व तिसरीने प्रयत्न केला; परंतु त्‍यात त्‍यांना अपयश आल्‍याने दोन्ही मुली बुडाल्‍या. सुदैवाने आई आणि दुसरी मुलगी मात्र थोडक्यात बचाचल्या.

खदाणीत दोन सख्ख्या बहिणी बुडाल्‍याच्या घटनेबाबत डॉ. आसिफ कुरेशी, जुबेर शेख यांनी माहिती दिली. मोल मजुरी करणारे शेख रशीद हे शेतात कामावर गेले होते. यावेळी त्यांची पत्नी तायराबाई, मुलगी आशियाबी शेख रशीद (वय १७), गुलनाजबी (वय १५) व रुखसार (वय ११) हे सर्व पोपट तलावाच्या वाहत्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेले होते. 

मोगरी पाण्यात पडली अन्‌ झाला घात
पावसामुळे तलाव व खदान परिसरात पाण्याचा मोठा साठा झाला आहे. कपडे धुताधुता अचानक लाकडी मोगरी हातातून सरकून पाण्यात वाहू लागल्याने गुलनाजबी हिने ती काढण्यासाठी पुढे पाऊल टाकताच ती पाण्यात बुडू लागली. आपली बहिण बुडतेय म्‍हणून तिला वाचविण्यासाठी रुखसार ही पुढे असता ती देखील पाण्यात बुडाली. यावेळी त्यांची आई सायराबाई हिने पळत जाऊन जवळच्या नगरसेवक कैलास चौधरी यांच्या स्टोन क्रेशरवरील मजुरांना आरोळ्या मारीत बोलावले. दरम्‍यान तिसरी मुलगी आशियाबी आपल्‍या दोन्ही बहिणींना वाचविण्यासाठी पाण्यात उतरली असता ती देखील पाण्यात बुडत असताना भैय्या चौधरी, गोलू चौधरी आदींनी तिला वाचवले. पाणी जास्त असल्याने गुलनाजबी व रुखसार यांचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला. पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. 

रुग्णालयात प्रचंड गर्दी अन्‌ आक्रोश
अत्यंत गरीब परिस्थिती असलेले शेख रशीद यांच्यावर कोसळलेल्या गंभीर घटनेचे वृत्त कळताच आझाद चौक, कुरेशी मूहल्ला, भागातील नागरिकांनी कुटीर रुग्णालयात एकच गर्दी केली होती. खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्ष करण पवार, नगरसेवक पी. जी. पाटील, दीपक अनुष्ठान, डी. बी. पाटील, भिमराव जावळे यांनी भेटी देऊन कुटुंबाचे सांत्वन केले. या बाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संपादन : राजेश सोनवणे