आधी घरात चोरी केली नंतर घरापुढे येवून चोरलेले दागीने पून्हा आणून ठेवले 

दीपक कच्छवा
Wednesday, 23 September 2020

ज्या घरातून चोरी केली होती त्याच घराच्या दरवाजाजवळ आणून दिल्याची अत्यंत सुखद घटना समोर आली आहे. पोलीसांनी हे दागिणे व रोकड संबंधीत महिलेला परत केली.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव-)  :चोराने एखाद्या घरात चोरी केली आणि चोरलेला किंमती ऐवज परत केल्याचे आतापर्यंत कधी ऐकले नाही. पण अशी सत्य घटना चाळीसगाव तालुक्यात घडली आहे.घर बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्याने अॅल्युमिनीयमच्या डब्यात ठेवलेले सुमारे 2 लाख 82 हजार रूपये किंमतीचे सोन्याचेे दागिणे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून लंपास केल्याची घटना तालुक्यातील न्हावे येथे घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पोलीस तपास करून चोरट्यांच्या मागावर असतांनाच चोरलेली रोकड व सोन्या चांदीचे दागिने असलेली पिशवी ज्या घरातून चोरी केली होती त्याच घराच्या दरवाजाजवळ आणून दिल्याची अत्यंत सुखद घटना समोर आली आहे. पोलीसांनी हे दागिणे व रोकड संबंधीत महिलेला परत केली.चोरट्याच्या या दातृत्वाचे कौतुक होत आहे.
 

या घटनेची माहिती अशी की, न्हावे येथील पुष्पाबाई संभाजी पाटील (51) ह्या दि.16 रोजी सायंकाळी चाळीसगाव येथे आल्या. त्या रात्रभर चाळीसगाव येथेच मुक्कामी होत्या. दुसऱ्या दिवशी 17 रोजी सकाळी त्या आपल्या गावी गेल्या असता त्यांच्या घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले व मधल्या खोलीतील लोखंडी भांडे ठेवण्याचे रॅकमध्ये ठेवलेल्या अॅल्युमिनीयमच्या डब्यातील 15 हजार रुपये व 16 तोळे सोन्याची दागिने असा एकूण 2 लाख 82 हजार 500 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे कोणीतरी अज्ञात चोरट्याने (ता.16) चे दुपारी 2 ते (ता.17)चे सकाळी साडेआठच्या सुमारास घरफोडी करून व लबाडीच्या इराद्याने चोरून नेले होते.

याप्रकरणी पुष्पाबाई संभाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजीत लांडे, पोलीस उपनिरीक्षक संपत आहेर, पोना भूपेश वंजारी,बिभिषण सांगळे, चालक हवालदार नितेश पाटील यांचे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपी व चोरी गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेत होते.हा तपास सुरु असतांनाच (ता.20) रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने पैसे व सोन्याचे दागिणे असलेली एक प्लास्टीकची पिशवी फिर्यादीचे घरासमोर टाकून दिली. ही माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसांचे पथक न्हावे येथे जावून पंचांसमक्ष ते दागिणे व रोकड असलेली पिशवी जप्त केली. त्यानंतर 15 हजार रूपयांची रोकड व 16  तोळे दागिने संबंधीत महिलेला मंगळवारी पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या उपस्थितीत परत करण्यात आले.पोलीसांनी आपली भूमिका चोख बजावून गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या दोन दिवसातच चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात  यश मिळवले. पोलीसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.चोरीस गेलेली माझी आयुष्याची संपूर्ण जमा पुंजी पुन्हा मिळणार नाही असे वाटले होते, मात्र पोलीसांनी ही जमा पुंजी मिळवून दिल्याने फिर्यादी पुष्पाबाई पाटील यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांचे आभार मानले.

कारवाईच्या भितीने चोरट्याचा प्रामाणिकपणा?

न्हावे गावी झालेल्या या जबरी चोरीने चांगलीच खळबळ उडाली होती. पोलीसांचे पथक याबाबत सखोल तपास करीत असतांनाच न्हावे गावातीलच काहींनी ही चोरी केली असल्याचे पोलीसांच्या नजरेस आले. पोलीसांनी चौकशीसाठी काही जणांना ताब्यातही घेतले होते. या चोरीचा मास्टरमाईन्ड समोर येत असल्याने पोलीस त्याच्या पर्यंत पोहचतील अशी भिती बहुदा चोरट्याला वाटली असावी आणि कारवाईच्या भितीने त्याने हे चोरलेले रोकड व दागिणे परत केली.चोरलेले एवढे किंमती दागिने चोरट्याने परत केल्याची चाळीसगाव तालु्नयाती ही बहुदा पहिलीच घटना असावी.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon After the thief stole, he brought back the stolen jewelry in the same house