घरात लग्नाची तयारी सुरू आणि वधू घरातील पैसे घेवून पसार

दिपक कच्छवा
Monday, 14 December 2020

महिलेला दोन दिवसांत पैसे देतो, असे अंकुशने सांगितले व पैशांची व्यवस्था झाल्यावर मध्यस्थ संगीताने प्रथम चिखली येथे एक मुलगी दाखविली.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : लग्नाच्या विवंचनेत असलेल्या वडाळा (ता. चाळीसगाव) येथील ३२ वर्षीय तरुणाचे मध्यस्थांमार्फत लग्न ठरले. त्यापोटी नियोजित वराने दीड लाख रुपये मोजले. घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच आणि लग्नाचा बस्ता करण्यासाठी वराचे कुटुंबीय व नियोजित वधू चाळीसगावात आली असताना वधूसह तिच्या साथीदारांनी पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीसह संबंधित भामट्यांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 वाचा - शिवसेनेचे अनोखे आंदोलन; साचलेल्या पाण्यात कागदी बोटी सोडून सत्ताधारी भाजपचा निषेध  

वडाळा (ता. चाळीसगाव) येथील अंकुश भाऊसाहेब आमले (वय ३२) हा आपल्या आई व भावासह शेती व्यवसाय करतो. अंकुशचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. लग्नाचे वय झाल्याने त्याची आई व नातेवाईक अंकुशसाठी मुलीच्या शोधात होते. त्याने आपल्या मावसाला एखाद्या एजंटमार्फत मुलगी शोधण्यास सांगितले. औरंगाबाद येथील संगीता पाटील ही महिला लग्न जुळवून देते, असे कळाल्यानंतर त्यांनी संपर्क साधला. त्यानंतर संगीता ५ डिसेंबरला ओझर येथे आपल्या मुलीस भेटण्यास आली होती. तेथे अंकुश व त्याचा मावसा दोघे त्या महिलेस भेटले. तिने, मी तुम्हाला लग्न करण्यासाठी एखाद्या गरीब घरातील मुलगी शोधून देते; पण त्या लग्नासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल, असे सांगितले. 

दोन दिवसांत पैसे देतो 
संबंधित महिलेला दोन दिवसांत पैसे देतो, असे अंकुशने सांगितले व पैशांची व्यवस्था झाल्यावर मध्यस्थ संगीताने प्रथम चिखली येथे एक मुलगी दाखविली. ती पसंत न पडल्याने ओझर येथे दुसऱ्या मुलीला बोलविण्यात आले. तेथे नातेवाइकांसह अंकुश याच्याशी संगीताने त्या मुलीशी ओळख करून दिली. 

दोन दिवसांत लग्न 
या मुलीचे नाव ममता असे असल्याचे व तिच्याबरोबर आलेले अशोक चौधरी (रा. कुंभारखेडा, ता. रावेर), संदेश वाडे, अकिल मामा, रेखाबाई (रा. चिखली, जि. बुलढाणा), तसेच सोबत इतर तीन ते चार लोक होते. अंकुश यास संगीतासोबत आलेली मुलगी पसंत पडल्याने लग्नासाठी त्याने होकार दिला. मुलीकडील मंडळींनी लगेच दोन दिवसांत लग्न लावून देऊ, असे सांगितले व लग्नाच्या तयारीसाठी दीड लाख रुपये लागतील, असे सांगितले. हे दीड लाख रुपये संगीता हिच्याजवळ देण्यात आले. संगीताने पैसे घेतल्यानंतर ती व तिच्यासोबतची एक महिला व इतर लोक आलेल्या वाहनाने निघून गेले. दुसऱ्या दिवशी बस्ता करावयाचा असल्याने लग्नासाठी आलेली ती मुलगी अंकुशचा मावसा यांच्याकडे ओझर येथे मुक्कामी होती, तर अंकुश आणि त्याचे कुटुंब लग्नाच्या तयारीसाठी घरी परतले. 

वाचा- मित्राच्या हळद कार्यक्रमाला निघाला मित्रांना, कुटूंबाला चटका लावून गेला -
 

नियोजित वधूने ठोकली धूम 
नियोजित वधूने शनिवारी (ता. १२) दुपारी एकला अंकुश व त्याचे नातेवाईक आणि सोबत लग्न करण्यासाठी आलेली ममता नावाची मुलगी हे सर्व जण लग्नाचा बस्ता करण्यासाठी चाळीसगावी आले. नियोजित वधूचे कपडे खरेदी करण्यात आले. त्यानंतर अंकुशची आई व बहीण आणि ती मुलगी ममता असे सराफ बाजाराकडे जात असतानाच ममता ही एका व्यक्तीबरोबर वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती अंकुशच्या बहिणीने दिली. त्या वेळी अंकुशसह इतर नातेवाईक जुन्या पालिकेजवळ आले व ती तरुणी आणि तिच्यासोबत आलेल्या व्यक्तीबाबत विचारपूस केली असता, त्या तरुणीचे खरे नाव रेशमा रफिक खान (रा. शहानगर, बीड बायपास, औरंगाबाद) व तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव अशोक चौधरी (रा. कुंभारखेडा, ता. रावेर) असे असल्याचे सांगितले. तसेच त्या मुलीने अंकुश याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्या वेळी तरुणीकडे दिलेले दीड लाख रुपये मागितले असता, तिने हे पैसे संगीता घेऊन गेल्याचे सांगितले. 

रॅकेट असण्याची शक्यता 
तरुणाच्या फसवणूक प्रकरणी ममता ऊर्फ रेश्मा रफिक खान, संगीता पाटील (रा. औरंगाबाद), अशोक चौधरी (रा. कुंभारखेडा), संदेश वाडे, अकिल खान, रेखाबाई (रा. चिखली) व इतर दोन ते तीन जण यांच्याविरोधात अंकुश आमले याने दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon bride took the money and ran away