
ग्राहक येईल या आशेने आम्ही माल आणून ठेवला आहे, परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल ५० ते ६० टक्क्यांनी सुका मेव्याचे खरेदी घटली आहे.
- सुनील कोतकर, किराणा व्यापारी, चाळीसगाव
चाळीसगाव (जळगाव) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका यंदा सुकामेवा विक्रीला देखील मोठ्याप्रमाणात बसला आहे. मेथीच्या लाडूंसाठी लागणाऱ्या खारीक, खोबरे, काजू, बदाम यासह अन्य सुकामेव्याचे भाव कमी असून, देखील याची मागणी ५० टक्याने घटली असून, व्यापाऱ्यांकडे माल तसाच पडून आहे.
दिवाळी झाल्यानंतर थंडीची चाहूल लागताच हिवाळ्यात आरोग्यदायी ठरणारे मेथीचे लाडू करण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू होते. मेथीचे लाडू आरोग्यवर्धक असल्याने यामुळे श्रीमंतपासून तर गरीबांपर्यंत प्रत्येक जण मेथीचे लाडू करतात. यामुळे लाडूसाठी लागणारे खारीक, गूळ ,खोबरे, काजू, बदाम, मेथी, डिंक, या वस्तूंची खरेदी जोरात सुरू होते. चाळीसगाव शहरात जवळपास या सुका मेव्याचे २०० व्यापारी आहेत. जळगाव व मुंबईहून या मालाची आवक होत असते. दरवर्षी हिवाळ्यात सुकामेव्याच्या खरेदी-विक्रीतून जवळपास चार ते पाच कोटींची उलाढाल होते. परंतु यंदा दिवाळी होऊन दीड महिना झाला, तरीही लॉकडाउनच्या फटक्यामुळे या सुकामेव्याची मागणी घटली आहे. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला बहुतांश माल हा तसाच पडून असून, दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत भाव कमी
मेथीच्या लाडूसाठी लागणाऱ्या सुका मेव्याचे भाव मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जवळपास १० ते १५ टक्के कमी आहेत. तरी देखील यंदा मालाला उठाव नसून व्यापारी माल आणण्यासाठी देखील धजावत नसल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे.
असे आहेत सुकामेव्याचे भाव (प्रतिकिलो)
खारीक ................. २०० ते ३००
गूळ ..................... ४० ते ५०
खोबरे .................... १८० ते २४०
काजू ..................... ७०० ते ८००
बदाम ..................... ५०० ते ६००
मेथी ....................... ८० ते १००
डिंक ....................... २०० ते ५००