
गौताळा अभयारण्याच्या पाटणादेवीसह औट्रम घाट भागात नैसर्गिकरित्या आकर्षक असलेले मौल्यवान दगड आजही अस्तित्वात आहेत, जे गारगोटीच्या नावाने ओळखले जातात. या गारगोट्यांना बाजारात लाखो रुपये मिळतात.
चाळीसगाव (जळगाव) : गौताळा अभयारण्यातील वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करून लाखो रुपये किमतीचे मौल्यवान दगड चोरणाऱ्यांना वन विभागाने धडक कारवाई करून पकडले. याप्रकरणी चौघा संशयितांकडून गारगोट्यांची तस्करी केली जात असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडे इतरही किमती वनौषधी व इतर मुद्देमाल मिळून आला.
गौताळा अभयारण्याच्या पाटणादेवीसह औट्रम घाट भागात नैसर्गिकरित्या आकर्षक असलेले मौल्यवान दगड आजही अस्तित्वात आहेत, जे गारगोटीच्या नावाने ओळखले जातात. या गारगोट्यांना बाजारात लाखो रुपये मिळतात. २३ जानेवारीला हे मौल्यवान दगड गौताळा औट्रामघाट अभयारण्याला लागून असलेल्या मौजे गराडा (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील आरोपी कालेखॉ सरदार खाँ, शरीफ सरदारखाँ पठाण, कालूखाँ पठाण व महेबुबखाँ पठाण यांनी अवैधरित्या उत्खनन करुन चोरल्याची गुप्त माहिती वन विभागाला प्राप्त झाली. त्यानुसार, वन्यजीव व प्रादेशिक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चारही संशयितांच्या घरी अचानकपणे धाड टाकली. घरांची तपासणी केली असता, चौघांकडे नायट्रोलाइट, ॲपोफायलाइट, चॅबाझाइट प्रकारातील मौल्यवान खडक (गारगोट्या) तसेच सफेद मुसळी व डिंक असा जंगलातील महत्त्वपूर्ण ऐवज मिळून आला. या मुद्देमालाचे वजन केले असता, मौल्यवान दगड ३०१ किलो, सफेद मुसळी ५.१५ किलो, धामोडी डिंक ६.८४ किलो भरले. याशिवाय चारही संशयितांकडे टिकाव, कुदळ, छन्या, टॉमी, करवत इत्यादी साहित्य देखील मिळून आले.
चौघेही फरार
दरम्यान, वन अधिकाऱ्यांचा सुगावा लागताच चौघे संशयित अभ्यारण्यात पसार झाले. मिळालेल्या माहितीवरून रात्री उशिरापर्यंत अभ्यारण्यात वन विभागाने शोध मोहीम राबवली. या मोहिमेसाठी नंदुरबारचे सहायक वन संरक्षक धनंजय पवार, जळगाव जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तथा सर्पतज्ज्ञ राजेश ठोंबरे, जामनेर येथील वन परीक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांनी सहकार्य केले. गराडा (ता. कन्नड) गाव अवैध व्यवसायासाठी कुविख्यात आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासासाठी गावातून वन विभागाला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
ही कारवाई औरंगाबाद वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे, कन्नड वन्यजीव परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. शेळके, वन्यजीवचे सागर ढोले, फिरते पथक औरंगाबादचे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद गायके यांनी केले. या सर्वांना वनपाल संदीप मोरे, विजय ढिघोळे, मनोज उधार, पोपट बर्डे, श्री. काटकर, श्री. देशमुख, रायसिंग, श्री. दारुंटे, पोलिस पाटील व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. अभ्यारण्यात अवैध उत्खनन व तस्करीप्रकरणी चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. शेळके तपास करीत आहेत.
जंगलातील संपत्तीचे रक्षण करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. वन्यप्राणी किंवा इतर मौल्यवान वनउपजांसंदर्भात कुठलाही वन गुन्हा निदर्शनास आल्यास तत्काळ नागरिकांनी वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधवा.
- राजेश ठोंबरे, मानद वन्यजीव रक्षक, चाळीसगाव
संपादन ः राजेश सोनवणे