काय सांगतात राव !  चक्क आता बगळ्यांची होत आहे शिकार    

दीपक कच्छवा
Thursday, 17 September 2020

गिरणा पट्टा नैसर्गिक समृद्धीने व हिरवाईने बारामाही बहरलेला असतो. तालुक्यात गिरणा काठावर मोठ्या प्रमाणावर आकर्षक दिसणाऱ्या बगळ्यांचे थवेच्या थवे दृष्टीस पडतात.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव)  ः पांढरा शुभ्र असा बगळा रानावनात, पाणथळ जागेत विशेषतः बागायती क्षेत्रात सर्वत्र आढळणारा पक्षी... त्याचे मुख्य खाद्य छोटे मासे, किडे, बेडूक आळ्या, काही प्रकारचे शेवाळी असे आहे. आतापर्यंत त्याच्या वाटेला कुणी शिकारी गेल्याचे ऐकिवात नाही...मात्र, आता हे घडू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्ट्यात काही शिकाऱ्यांकडून बगळ्यांची सर्रास शिकार केली जात असल्याचे अलीकडेच निदर्शनास आले आहे. वन विभागाने या शिकारींना आळा घालून व बगळ्यांची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमींकडून होत आहे. 

भारतात अनेक प्रकारचे बगळे आढळून येतात. त्यात नर बगळा, मादी बगळा-बगळी यांचा समावेश आहे. बगळे समूहाने पाण्याजवळ, समुद्रकिनाऱ्याजवळ, शेतात किंवा दलदलीच्या जागी आढळून येतात. त्यांची घरटी पाण्याजवळ तसेच पाण्यापासून दूरच्या झाडांवर असतात.एका झाडावर त्यांची अनेक घरटी असतात. गिरणापट्यातही विविध जातीचे बगळे आहेत. यामध्ये शुभ्र बगळा, राखी बगळा, रंगीत बगळा, गाय बगळा, करकोचा, रंगीत करकोचा, पांढऱ्या मानेचा करकोचा, रोहित पाणकावळा, चक्रवाक बदक यांचा समावेश आहे. चरणाऱ्या गुरांबरोबर गायबगळे मोठ्या कळपाने व एकटेही आढळतात. गायबगळे जनावरांबरोबर दिसून येतात. आता मात्र मांस भक्षणासाठी शिकाऱ्यांची नजर या पक्षाकडेही पडल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. 

अशी केली जाते शिकार 
गिरणा पट्टा नैसर्गिक समृद्धीने व हिरवाईने बारामाही बहरलेला असतो. तालुक्यात गिरणा काठावर मोठ्या प्रमाणावर आकर्षक दिसणाऱ्या बगळ्यांचे थवेच्या थवे दृष्टीस पडतात. यात बगळ्यांची संख्या हजारोंच्या संख्येने आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिकाऱ्यांचा वावर वाढला असून या शिकाऱ्यांकडून मांस भक्षणासाठी बगळ्यांची शिकार केली जात आहे. दिवसभर गिरणा नदीकाठी मनसोक्त सैर करणारे हे बगळे सायंकाळ होताच नदीच्या आसपास असणाऱ्या झाडांवर किंवा गावाच्या बाहेर तसेच रस्त्यालगत मोठ्या झाडांवर बनवलेल्या खोप्यांमध्ये सुरक्षित आश्रय घेतात. ही संधी साधून काही शिकारी हे रात्रीच्या सुमारास बगळ्यांचा वावर असलेल्या झाडांवर चढून बगळ्यांना पकडून गोण्यांमध्ये टाकतात. यामुळे मांस भक्षणासाठी तर ही तस्करी होत नाही ना, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. बगळ्यांची हत्या हा प्रकार पक्ष्यांवर आघात करणारा आहे. 

वनविभागाने बंदोबस्त करावा 
गिरणा परिसरात बगळ्यांची राजरोसपणे हत्या करून त्यांची तस्करी करणाऱ्या शिकाऱ्यांना शोधून वन विभागाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा काही वर्षांतच या भागातून बगळेही नामशेष होऊन ती पक्षी जमातही दुर्मीळ या कक्षेत मोडेल. त्यामुळे बगळ्यांची शिकार तातडीने थांबवून त्यांचे प्राण वाचवावेत, अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे. 

आपल्या परिसरात गिरणा नदीसह इतरही काही नद्या, तलाव, बंधारे, धरणे आहेत. या पाणवठ्यावर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे पाणपक्षी आहेत. काठावरील झाडांवर त्यांनी निवासासाठी घरटी केली आहेत. या सर्व पक्षांना वन कायद्याने संरक्षित घोषित केले आहे. त्यामुळे त्यांना पकडणे, त्रास देणे, त्यांची निवासस्थाने नष्ट करणे, या कृती गुन्ह्यात मोडतात. असे कृत्य करताना आढळून आल्यास त्या व्यक्तीला जबर दंडासह तुरुंगवास होऊ शकतो . 
- राजेश ठोंबरे,  मानद वन्यजीव रक्षक, चाळीसगाव 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon Heron hunting is taking place in the mill area, wildlife organization demands to stop