हृदयद्रावक..कन्येच्या लग्‍न मंडपात‌ आईचा अखेरचा श्‍वास

बापू शिंदे
Tuesday, 8 December 2020

लग्‍नाची तयारी पुर्ण झाली. मुलीचा विवाह लावून तिला सासरी पाठविताना आईचे डोळे निश्‍चितच पाणावतात. यात विवाह सोहळ्याचा दिवस आणि मुलीच्या डोक्‍यावर अक्षदा टाकण्याची वेळ जवळ आली असतानाच घरातून दुःखद बातमी लग्‍न मंडपात पसरली. ही बातमी ऐकून सारे आनंदाचे क्षण अश्रूंमध्ये रूपांतर झाले.

चाळीसगाव (जळगाव) : येथील भोकरे परिवारात आज विवाह सोहळा होता. मुलीचा विवाह असल्‍याने वधू मंडळींकडून वर मंडळीच्या स्‍वागताची तयारी देखील पुर्ण झाली होती. पण मुलीचे लग्‍न लागण्यापुर्वीच दुःखद घटनेने मंडपात शांतता पसरली. मुलीच्या डोक्‍यावर अक्षदा टाकण्यापुर्वीच आईने अखेरचा श्‍वास घेतल्‍याची घटना घडली.

भामरे कुटूंब आनंदातून दुःखात
चाळीसगाव येथील भोकरे परिवाराकडून मुलगी मयुरी हिच्या विवाहाची तयारी झाली होती. लग्‍नाचा दिवस उजाळल्‍याने मुलीला सासरी पाठविण्याची देखील तयारी झाली. मात्र विवाहाच्या दिवशीच लग्नापुर्वी वधूच्या आईचे निधन झाल्याची दुख:द घटना घडली. आपल्या कन्येचा विवाह सोहळा बघण्यापुर्वीच मातेने अखेरचा श्वास घेतला. एकीकडे मंगलमय वातावरण व त्यात निधनाची घटना अशा दुहेरी पेचात भोकरे परिवार सापडला. संगीता राजेंद्र भोकरे या तरवाडे जि.प.शाळेत शिक्षीका होत्या. त्यांचे पती राजेंद्र भोकरे हे उमरखेड (भडगाव) येथे शिक्षक आहेत. संगिता या कर्करोगाने पिडीत असल्‍याचे सांगण्यात आले.

विवाहाचा विधी केला पुर्ण
संगिता राजेंद्र भोकरे (50) असे निधन झालेल्या शिक्षीकेचे नाव असून त्यांची मुलगी मयुरी हिचा आज विवाह होता. विवाह सोहळा पुर्ण होण्यापुर्वीच संगिता भोकरे यांची मृत्युशी गाठ पडली. त्यामुळे दुपारीच मयुरी हिचा विवाह सोहळा साध्या पद्धतीने आटोपून सायंकाळी संगिता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon mother's last breath in the daughter wedding tent