माजी सैनिकाला मारहाण प्रकरणी खासदार पाटलांची होणार चौकशी; गृहमंत्र्यांनी काढले आदेश 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

चाळीसगाव येथील एका माजी सैनिकाला मारहाण केल्‍याचे प्रकरण घडले होते. जळगाव लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी २०१६ मध्ये चाळीसगाव येथे एका कार्यक्रमाप्रसंगी झालेल्या वादात उडी घेत सैनिकाला मारहाण केल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. तेव्हा ते आमदार होते. त्‍यावेळी राज्‍यात भाजपचे सरकार असल्‍याने प्रकरण दडपण्यात आल्याचे आरोपही झाले.

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांच्यावर चाळीसगाव तालुक्यातील माजी सैनिकाला मारहाण केल्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. सण २०१६ मध्ये उन्मेश पाटील आमदार असताना हे प्रकरण घडले होते. 
चाळीसगाव येथील एका माजी सैनिकाला मारहाण केल्‍याचे प्रकरण घडले होते. जळगाव लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी २०१६ मध्ये चाळीसगाव येथे एका कार्यक्रमाप्रसंगी झालेल्या वादात उडी घेत सैनिकाला मारहाण केल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. तेव्हा ते आमदार होते. त्‍यावेळी राज्‍यात भाजपचे सरकार असल्‍याने प्रकरण दडपण्यात आल्याचे आरोपही झाले. तक्रार करूनही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. जळगावचे पोलिस अधीक्षक यांना यासंदर्भात आदेश देण्यात आले असून चौकशी करुन गृह विभागाला अहवाल सादर करण्यासंबंधी आदेशात म्हटले आहे. 

कुटूंबियांनी घेतली होती न्यायालयात धाव 
राज्‍यात भाजपचे सरकार असताना म्‍हणजे २०१६ मध्ये सध्याचे खासदार असलेले उन्मेश पाटील हे चाळीसगाव मतदार संघातील आमदार होते. त्‍यांनी माजी सैनिक सोनू महाजन यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप महाजन कुटुंबीयांनी केला होता. त्यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, मात्र भाजप सरकारच्या काळात गुन्हा दाखल झाला नाही. शेवटी महाजन कुटुंबीयांनी न्यायलयात धाव घेतली होती. 

आता शिवसैनिकांचे प्रकरण म्‍हणून... 
राज्‍याचे मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांच्यावर नौदलाचे माजी सैनिक मदन शर्मा यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली होती. या कारणावरून शिवसैनिकांकडून शर्मा यांना मारहाण केल्‍याची घटना ताजी आहे. यावरून शिवसेनेवर टीका होत असून, मग २०१६ मध्ये भाजपच्या आमदाराने माजी सैनिकाला केलेल्‍या मारहाणीचे प्रकरण काढण्यात आले. यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी लागलीच चौकशीचे आदेश काढले आहेत. 
 
२०१६मध्ये घडलेल्या कथित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश गृहविभागाने काढले असतील, तर मी त्याचे स्वागत करतो. माझा कायदा व न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास आहे. माझा संबंध नसलेल्या प्रकरणात माझे नाव गोवण्यात आले असून चौकशीतून सत्य बाहेर येईल. सैनिकांप्रती मला आदर आहे, आणि यापुढेही राहील. 
- उन्मेश पाटील, खासदार, जळगाव 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon mp unmesh patil enquiry in home minister deshmukh