चाळीसगावात गावठी कट्यासह तरुणाला अटक; दुसरा फरार

दिपक कच्छवा
Thursday, 19 November 2020

गांजा पाठोपाठ आता गावठी पिस्तुलही चाळीसगावात मिळू लागल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पिस्तुल विक्री करणारी टोळी कार्यरत आहे

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): गांजा प्रकरणात चाळीसगावाचे नाव संपूर्ण राज्यात चर्चेत आले होते यानंतर आता पोलीसांनी गावठी बनावटीच्या पिस्तुलासह तीन जीवंत काडतुसे जप्त केली. ही थरारक कारवाई नागदरोड झोपडपट्टी भागात घडली.यावेळी पोलीसांच्या पथकाने एकास पकडले तर त्याचा हिस्ट्रीसिटर साथीदार पळून जाण्यास यशस्वी ठरला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना गुप्त माहिती मिळाली की, चांद सलीम सैय्यद (वय23) रा. आठवडे बाजार झोपडपट्टी, नवीन पाण्याच्या टाकीजवळ, चाळीसगाव व दानिश असलम शेख(वय27) रा. नागदरोड झोपडपट्टी हे गावठी पिस्तुल कब्जात बाळगून घाटरोड परिसरात नगरपालीका शॉपिंग कॉम्पले्नसजवळ चहाच्या टपरीजवळ थांबले आहेत.अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. ठाकूरवाड यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक निसार सैय्यद, भगवान उमाळे, पंकज पाटील, ओंकार सुतार, निलेश पाटील, अमोल पाटील यांच्या पथकाने बुधवार (ता. 18) रोजी रात्री 10.20 वाजेच्या सुमारास दोघांवर अचानक झडप घातली. मात्र यावेळी दानिश शेख हा पोलीसांना पाहताच पळून गेला तर चांद सलीम सैय्यद हा पथकाच्या हातात लागला.

झडती आढळून गावठी पिस्तूल

या पथकाने त्याची अंगझडती घेतली असता पॅन्टच्या चोर खिशात 30 हजार रूपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तुल व 2 हजार रूपये किंमतीची स्टीलच मॅगझिन तसेच 600 रूपये किंमतीचे तीन जीवंत काडतुसे असा 32 हजार 600 रूपयांचा ऐवज जप्त केला. पळून गेलेला दानिश असलम शेख हा रेकॉडवरील गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलीस हवलदार निलेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चांद सलीम सैय्यद व दानिश असलम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निसार सैय्यद हे करीत आहेत.

 

विक्री करणारी टोळी सक्रीय आहे की काय ?

चाळीसगावात गजबजलेल्या भागात दोघांकडे पिस्तुलसह जीवंत काडतुसे आढळून आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.गेल्या काही दिवसापासून अवैध धंदे, गांजा तस्करी,गुटखा विक्री यामुळे चाळीसगावचे नाव गाजत असतांना आत चक्क पिस्तुल आढळून आले आहे.गेल्या काही दिवसापासून हाणामारीच्या घटनांमुळे नागदरोड परिसर चांगलाच चर्चेत आला असतांनाच बुधवारी रात्री झालेल्या कारवाईमुळे चर्चेला उधान आले आहे.गांजा पाठोपाठ आता गावठी पिस्तुलही चाळीसगावात मिळू लागल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पिस्तुल विक्री करणारी टोळी कार्यरत आहे की, कुणावर हाल्ला करण्यासाठी हे पिस्तुल बाळगण्यात येत होते आसा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापूर्वीही शहरात गावठी पिस्तुल सापडल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे पोलीसांनी या पिस्तुल प्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी होत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon pistols, bullet seized in chalisgaon One was arrested