वरखेडेसह लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या भूसंपादन प्रस्तावांना चालना मिळणार !

आनंन शिंपी
Saturday, 31 October 2020

वरखेडे लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्प या प्रकल्पाचा मुख्य कालवा व त्यावरील संपूर्ण वितरणाचे काम सिंचन अनुसरून बंदिस्त पाइपलाइनद्वारे करावयाचा प्रस्ताव मुख्यमंत्री व जलसंपदामंत्री यांना पाठवण्याबाबत सूचित केले.

चाळीसगाव : तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार मंगेश चव्हाण यांची तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या संचालकांसोबत बैठक झाली. प्रकल्प व कामे गतीने मार्गी लावण्याची मागणी सुचना दिल्या.

वरखेडे लोंढे बॅरेज बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी वितरण, लघुपाटबंधारे तलाव हातगाव क्रमांक २, चितेगाव लघुपाटबंधारे, मुंदखेडे धरण येथील पाटचाऱ्या भूसंपादन व जमीन अधिग्रहणबाबत शेतकऱ्यांच्या विविध समस्या, गिरणा-मन्याड नदीजोड कालवा सर्वेक्षण, तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १० डिसेंबरपूर्वी गिरणा डावा कालवा व मन्याड उजवा कालवा यातून शेतीसाठी पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा झाली. वरखेडेसह लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या भूसंपादन प्रस्तावांना चालना मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. 

बैठकीच्या सुरवातीलाच आमदार मंगेश चव्हाण यांनी, वरखेडे लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्प या प्रकल्पाचा मुख्य कालवा व त्यावरील संपूर्ण वितरणाचे काम सिंचन अनुसरून बंदिस्त पाइपलाइनद्वारे करावयाचा प्रस्ताव मुख्यमंत्री व जलसंपदामंत्री यांना पाठवण्याबाबत सूचित केले. या वेळी कार्यकारी संचालक अरुण कामडे यांच्यासह मुख्य अभियंता आनंद मोरे, तसेच लघुपाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता, विविध विभागांचे कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते. पारंपरिक पाटचारी पाणी वितरणासाठी जमीन अधिग्रहणाचा मोठा प्रश्न येतो. त्यात अनेक शेतकऱ्यांचा विरोधदेखील होता, तसेच त्यासाठी २०० कोटींहून अधिक निधी लागणार आहे. मात्र बंदिस्त पाइपलाइन प्रणालीद्वारे वरखेडे धरणाचा कालवा केल्यास भूसंपादनाचा प्रश्न मिटणार असून, पाण्याची नासाडीदेखील होणार नाही, असे आमदार चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून प्रस्ताव तयार करून तो राज्य शासनाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या. 

तसेच लघुपाटबंधारे तलाव हातगाव क्रमांक २, चितेगाव लघुपाटबंधारे, मुंदखेडे धरण येथील पाटचाऱ्या भूसंपादन व जमीन अधिग्रहणबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी व मोबदला मिळण्यास होणारा उशीर याबाबत देखील आमदार चव्हाण यांनी कार्यकारी संचालक यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या वेळी हातगाव, अंधारी, तमगव्हाण, माळशेवगे, मुंदखेडे येथील शेतकरी उपस्थित होते. 

रब्बी हंगामासाठी आवर्तन देण्यात यावे 
तालुक्यातील तीसहून अधिक गावांना जीवनदायी ठरणाऱ्या मन्याड धरणात नदीजोड योजनेतून गिरणा धरणातील पाणी टाकणे, गिरणा डावा व मन्याड उजवा कालव्याची दुरुस्ती प्रस्ताव, मन्याड धरण उंचीवाढ व पाणी उपलब्धता प्रमाणपत्र याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री यांना पत्र दिले होते. त्यानुसार कार्यवाही करणेबाबत मंत्रालयातून सूचना तापी पाटबंधारे महामंडळाला मिळाल्या असून, त्यावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती कार्यकारी संचालक यांनी दिली. 

या वर्षी गिरणा व मन्याड ही दोन्ही धरणे १०० टक्के भरल्याने २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत दोन्ही धरणांतून रब्बी हंगामासाठी आवर्तन देण्यात यावे व किमान तीन आवर्तनांच्या माध्यमातून शेतीला पाणी देण्याचे नियोजन करण्याची सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी केली असता, संबंधित अधिकारी यांनी ती मान्य केली.  

 संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon Projects in chalisgaon taluka, speed up the work meeting with the tapi irrigation