‘फायनान्स’ अधिकाऱ्याची गाडी अडवत मारहाण; भररस्‍त्‍यावरून लुटले ९६ हजार

दीपक कच्छवा
Saturday, 14 November 2020

दुचाकीने नागदकडून चाळीसगावकडे येत असताना वाघले चौफुली ओलांडल्यानंतर पाचशे मीटर अंतरावर मागाहून नागदकडून काळ्या रंगाची विना क्रमांकाची पल्सर मोटारसायकल आली. या त्यावर तोंडाला पांढरे रूमाल बांधलेले तीन जण होते.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : तोंडाला पांढरे रूमाल बांधलेल्या व दुचाकीवरून आलेल्या तीन भामट्यांनी खासगी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ व मारहाण करीत त्याच्या खिशातील कर्जवसुलीचे ८८ हजार ६५० रूपयांची रोकडसह टॅब व मोबाईल असा ९६ हजार ६५० रूपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना भरदिवसा चाळीसगाव - नागद रस्त्यावर घडली. या प्रकरणी तिघांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि. चाळीसगाव येथे गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिप ऑफिसर म्हणून काम करत असलेले सचिन मांगीलाल राठोड (वय २८, रा. पिंपरखेड तांडा, ता. चाळीसगाव) आहे. राठोड यांच्याकडे बचत गटाच्या कर्जवसुलीचे काम असून, नागद, लोंजे, बहाळ, मेहुणबारे, उंबरखेड या गावांची जबाबदारी आहे. राठोड हे शुक्रवारी (ता.१३) नागद येथून कर्जवसुलीचे ८८ हजार ६५० रूपये गोळा करून दुचाकीने (एमएच १९, सीए ६८८०) या दुचाकीने नागदकडून चाळीसगावकडे येत असताना वाघले चौफुली ओलांडल्यानंतर पाचशे मीटर अंतरावर मागाहून नागदकडून काळ्या रंगाची विना क्रमांकाची पल्सर मोटारसायकल आली. या त्यावर तोंडाला पांढरे रूमाल बांधलेले तीन जण होते. त्यांनी राठोड यांची गाडी अडवून त्यापैकी एकाने राठोड यांच्या दुचाकीची चाबी काढून घेतली व चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. दुसरा एक जण गाडीवरून उतरला व त्याने सुद्धा दुचाकीच्या खाली ओढून जमिनीवर पाडून चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच त्यांच्या पाठीवरील बॅग व मोबाईल हिसकावून घेतला. ते तिघेही हिंदी बोलत होते. ‘यही है वो लडका,क्या रे लडकी का नाम लेता है क्या? असे सांगत हिंदीतून शिवीगाळ करीत होते. राठोड यांचा प्रतिकार त्या तिघांपुढे फिका पडला. त्या तिघांपैकी दुचाकी चालवणाऱ्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स घातली होती. दुसऱ्याच्या अंगात फिक्कट गुलाबी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट होती. तिसऱ्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व साधी पॅन्ट घातलेली होती. त्यापैकी शरीराने दोन जण जाड होते तर एक जण बारीक होता. 

..असा गेला ऐवज 
या तिघा भामट्यांनी सचिन राठोड यांच्याकडील ८८ हजार ६५० रूपयांची रोकड, ५ हजार रूपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा टॅब व ३ हजार रूपये किमतीचा अॅन्ड्राईड मोबाईल असा सुमारे ९६ हजार ६५० रूपयांचा ऐवज व राठोड यांच्या दुचाकीची चाबी घेऊन पल्सरवरून पळ काढला. या तिघा भामट्यांनी लूट करून दुचाकीवरून पळ काढल्यानंतर राठोड यांनी दुचाकी वाघले फाट्यापर्यंत लोटत नेत सुरू केली व झालेल्या घटनेची माहिती बँकेच्या वरिष्ठांना कळवून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी सचिन राठोड यांच्या फिर्यादीवरून तिघा अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon road finance officer 96 lakh robbery