पिंप्रीखुर्द परिसर झाला जलमय; नाला खोलीकरणामुळे पहिल्याच पावसात दोन कोटी लीटर पाणी 

दीपक कच्छवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह ग्रामस्थ व युवकांना एकत्र करून जलसंधारणाचे काम हाती घेतले. यासाठी ‘सकाळ’च्या ‘तनिष्का’ गटाच्या महिलांनी पुढाकार घेतला. ‘सकाळ माध्यम समुहा’कडे निधीची मागणी ‘तनिष्कां’नी केली. येथील पाणीटंचाई व विहिरींची खालावलेली पाण्याची पातळी लक्षात घेता, ‘सकाळ रिलीफ फंड’मधून निधी मंजूर करण्यात आला व तब्बल एक किलोमीटरपर्यंत नाला खोलीकरणाचे काम मे महिन्यात करण्यात आले.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘सकाळ रिलीफ फंड’मधून पिंप्री खुर्द (दडपिंप्री) (ता. चाळीसगाव) येथे करण्यात आलेल्या नाला खोलीकरणाच्या कामामुळे या भागात झालेल्या दमदार पावसात सुमारे एक कोटी लीटर पाणी साचले असून एक कोटी लीटर पाणी जमिनीत जिरले आहे. त्यामुळे या भागात तब्बल दोन कोटी लीटर पाणी जमा झाल्याने ‘सकाळ’मुळे पिंप्री खुर्द (दडपिंप्री) गावाचा  परिसर जलमय झाला आहे. ज्याचा सुमारे शंभर हेक्टर शेतीला फायदा होणार आहे.गावात पहिल्यांदाच पाणी अडवल्या गेल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

सकाळ माध्यम समूहाच्या ‘तनिष्का’ सदस्यांच्या पुढाकाराने ‘सकाळ रिलीफ फंड’मधून पिंप्री खुर्द (दडपिंप्री)(ता. चाळीसगाव) येथे नाला खोलीकरणाचे काम नुकतेच  करण्यात आले. आतापर्यंत या परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना दुष्काळाचा सामना करावा लागत होता. त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मुंबई ई डी चे उपायुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी पाणीटंचाई दूर कशी होईल,यावर मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह ग्रामस्थ व युवकांना एकत्र करून जलसंधारणाचे काम हाती घेतले. यासाठी ‘सकाळ’च्या ‘तनिष्का’ गटाच्या महिलांनी पुढाकार घेतला. ‘सकाळ माध्यम समुहा’कडे निधीची मागणी ‘तनिष्कां’नी केली. येथील पाणीटंचाई व विहिरींची खालावलेली पाण्याची पातळी लक्षात घेता, ‘सकाळ रिलीफ फंड’मधून निधी मंजूर करण्यात आला व तब्बल एक किलोमीटरपर्यंत नाला खोलीकरणाचे काम मे महिन्यात करण्यात आले. यासाठी तनिष्का गटातील शारदा पाटील,रंजना पाटील,ज्योतीबाई पाटील,संगिता पाटील,मनिषा पाटील,सुनंदा पाटील,योजनाबाई पाटील, निलाबाई पाटील, शिलाबाई चव्हाण,मुक्ताबाई चव्हाण,शिला चव्हाण,योगिताबाई चव्हाण, ज्योतिबाई चव्हाण, शांतीबाई कोळी,योगिता मोरे, सविता मोरे,इंदुबाई चव्हाण, स्वाती जाधव,रोहीणी जाधव, सविता सुर्यवंशी,यांचा मोठा वाटा आहे.

‘भगिरथाचा वारसा’ जागवला
‘सकाळ’च्या विश्‍वासार्हतेवर सहभागाची मोहोर उठवणाऱ्या ‘सकाळ’च्या वाचकांनी दिलेल्या भरघोस मदतीच्या पाठबळावर ‘सकाळ रिलीफ फंड’ने हाती घेतलेल्या ओढे, नाले, तलावांतील गाळ काढण्याच्या मोहिमेत राज्यातील अनेक गावांमधील पाणीटंचाईचा बिकट प्रश्न कायमस्वरूपी नष्ट झाला आहे. पिंप्री खुर्द (दडपिंप्री) (ता. चाळीसगाव) येथे झालेल्या दमदार पावसामुळे या नाल्यातील साचलेले एक कोटी लीटर पाणी जमिनीत मुरले आहे. ‘सकाळ रिलीफ फंडा’तून मिळालेल्या मदतीच्या जोडीला लोकवर्गणी, श्रमदान आणि यंत्रसामग्रीसह इंधनाची मदत उभी करून येथील ग्रामस्थांनी ‘भगिरथाचा वारसा’ जागवला आहे.

सुमारे दिडशे हेक्टरवर क्षेत्राला होणार लाभ
पिंप्री खुर्द  येथील एकूण क्षेत्रफळ ७०० हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे दिडशे हेक्टर क्षेत्राला नाल्यातील पाणीसाठ्याचा फायदा होणार आहे. या भागात प्रथमच असा पाणीसाठा झाला आहे.झालेला पाणीसाठा केवळ ‘सकाळ’मुळे दिसत असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. या भागातील विहिरींनाही साचलेल्या पाण्याचा फायदा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या बळीराजाला ‘सकाळ रिलीफ फंड’ची मोलाची मदत झाली आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत उपाययोजनांसाठी जलसंधारणाच्या कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल ‘सकाळ’ माध्यम समूहाचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

‘सकाळ रिलीफ फंड’मधून झालेल्या कामामुळे परिसरात एक वेगळाच आदर्श निर्माण झाला आहे. यामध्ये ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्यांचे देखील मोलाचे योगदान आहे. या पाण्यामुळे आमचा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे.
- आणिता राठोड, सरपंच, पिंप्री खुर्द (ता.चाळीसगाव)

‘सकाळ’ माध्यम समुहामुळे आमच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेती सिंचनासाठी पाणी साठवणुकीचा प्रश्न सुटण्यास भरीव मदत झाली आहे. त्यामुळे आम्ही दडपिंप्रीकर  दै. ‘सकाळ’च्या कायम ऋणात राहू.
- निर्मला देवरे,तनिष्का सदस्या पिंप्री खुर्द

सकाळ च्या अनमोल सहकार्याने, व उपायुक्त उज्वल कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने येथे अनेक वर्षापासून असलेला दुष्काळ  वरुणराजाच्या कृपेने दुर झाला आहे.या पाण्यामुळे आता शेतकऱ्यांच्या डोळ्यातुन आनंदाश्रू ओघळत आहे.यामुळे विहिरींच्या पातळीही निश्‍चितच वाढणार आहे.
- आर.एम.पाटील,शेतकरी पिंप्री खुर्द
 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon sakal relife fund nala kholikaran two corrore litter water