गोळीबाराची थरारक आणखी एक घटना उघड; गावठी पिस्‍तुल दिले काढून

दीपक कच्छवा
Friday, 4 December 2020

चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावर गिगाव शिवारातील गिरणा पाईपलाईन जवळ झुडपातून हे पिस्तुल शहर पोलीसांनी जप्त केले आहे. दरम्यान संशयित आरोपी अरबाज व त्याचा फरारी साथीदार या दोघांनी जळगावातील भाजपा माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावरही गोळीबार केल्याची कबुली पोलीसांसमोर दिली आहे.

मेहुणबारे (जळगाव) : चाळीसगाव शहरातील घाट रोड परिसरातील हुडको भागात आठ दिवसांपूर्वी शेख जुबेर उर्फ साबीर उर्फ बंबईया याच्यावर गोळीबार झाला होता. याप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या अरबाज दाऊद पिंजारी याने गोळीबारात वापरलेले पिस्तुल (गावठी कट्टा) पोलीसांना काढून दिले. 
चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावर गिगाव शिवारातील गिरणा पाईपलाईन जवळ झुडपातून हे पिस्तुल शहर पोलीसांनी जप्त केले आहे. दरम्यान संशयित आरोपी अरबाज व त्याचा फरारी साथीदार या दोघांनी जळगावातील भाजपा माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावरही गोळीबार केल्याची कबुली पोलीसांसमोर दिली आहे.

चाळीसगाव शहरातील हुडको कॉलनी, मदिना मशीद जवळ शुक्रवार (ता.28) नोव्हेंबर रोजी  शेख जुबेर उर्फ साबीर उर्फ बंबईया (वय25) हा हुडको भागातून मित्रांसमवेत गप्पा मारत असतांना एका यामाहा दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून जुबेर याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी जुबेरच्या मांडीत घुसली. या हल्ल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या जुबेर यास शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

पिस्तूल दिले काढुन
अरबाज पिंजारी याला  चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता  तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. अरबाजचा दुसरा साथीदार फरार आहे.त्याच्या दुसऱ्या साथीदाराचे पोलीस पथके शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निसार सैय्यद, पोलीस नाईक ओंकार सुतार हे करीत आहेत. दरम्यान अरबाजसह त्याच्या साथीदाराने जुबेर शेख याच्यावर गावठी कट्ट्यातून (पिस्तुल) गोळीबार केल्यानंतर त्यांनी दुचाकीवरून पळ काढला होता. त्यानंतर या गुन्ह्यात वापरलेले ते पिस्तुल चाळीसगाव मालेगाव रस्त्यावरील गिगाव (ता. मालेगाव) शिवारात गिरणा पाईपलाईन जवळ एका झुडूपात लपवले होते. चाळीसगाव शहर पोलीसांनी अरबाजची विचारपूस केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये हैदरच्या सांगण्यावरून हा गोळीबार केल्याची कबली देतांनाच या गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल कुठे लपवले होेते त्या ठिकाणी अरबाजला नेण्यात आले.त्या ठिकाणाहून गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आल्याची माहिती तपासीअधिकारी यांनी दिली.

माजी नगरसेवकावरही गोळीबार 
जळगावचे माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर गेल्या वर्षी 31 डिसेंबरला सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आर्यन पार्क जवळ संतोष पाटील हे आपल्या शेतात जात असतांना मागून आलेल्या दोघा जणांनी गोळीबार करत पळ काढला होता.हा गोळीबार आपणच केल्याची कबुलीही अरबाजने चाळीसगाव शहर पोलीसांना चौकशीदरम्यान दिली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon shutout case gan handover police and second case open