नागपुरात गांजा तस्करी; ते तिघे चाळीसगावचे 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

सुमारे २० लाख ३१ हजार ९७० रूपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला असून, पाचही संशयितांच्या विरोधात कपीनगर पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : नागपूर शहरातील कपिलेश्वर पोलिस ठाणे हद्दीत तेथील अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत पाच आरोपींकडून सुमारे २० लाख ३१ हजार ९७० रूपये किंमतीचा ७२ किलो ३९८ ग्रॅम वजनाचा गांजासह इतर मुद्देमाल पकडला आहे. यात अटक केलेल्या पाच संयशितांपैकी तीन जण हे चाळीसगाव येथील असल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. 
अंमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा नागपूर यांना गोपनीय माहिती मिळाली, की काही व्यक्ती हे कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ऑटोमोटिव्ह चौक मार्गे नागपूर, बाबा ताज सर्व्हिसिंग सेंटरजवळ सिल्व्हर रंगाची (एमएच १९, बीयू ५००३) या चारचाकी वाहनातून गांजा आणत आहेत. या माहितीवरून पोलिसांनी मंगळवारी (ता. १३) सापळा रचून कारला थांबवले. कारमध्ये जय रूपम गोवर्धन (वय २४, रा. बुरांडे ले आऊट, वरूड सेवाग्राम, वर्धा) सचिन कैलास देशमुख (वय ३२, रा. शिवशक्तीनगर, टाकळी प्र.चा. भडगाव रोड, चाळीसगाव) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील मुद्देमाल जप्त केला. त्यांना विचारपूस केली असता त्यांचे इतर साथीदार हे बुट्टीबोरी हद्दीत थांबल्याने लगेच पथक घटनास्थळी जावून अमित रोहिदास पाटील (वय ३०, रा. नवा मालेगाव रोड, चाळीसगाव), दीपक अशोक शेवाळे (वय ३९, रा. सिंधी कॉलनी, जळगाव), योगेश धोंडीराम साळुंखे (वय ३५, रा. दूध सागर मार्ग, ओंकार हॉस्पिटलच्या पाठीमागे, गणेशवाडी, चाळीसगाव) या तिघांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखा कार्यालयात हजर करून विचारपूस केली असता त्यांनी गांजा घेऊन जात असल्याची कबुली दिली. 

वीस लाखांचा मुद्देमाल जप्त 
अंमली पदार्थविरोधी पथकाने या पाचही जणांची वाहनासह झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ७२ किलो ३९८ ग्रॅम वजनाचा किंमत १० लाख ८५ हजार ९७० रूपये, तसेच ४८ हजार रूपये किंमतीचे सहा मोबाईल व ९ लाख रूपये किमतीची सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार असा सुमारे २० लाख ३१ हजार ९७० रूपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला असून, पाचही संशयितांच्या विरोधात कपीनगर पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon three parson hemp smuggling in nagpur city