धरणाचे काम झाले; पण शेतकऱ्यांना दोन वर्षाची प्रतीक्षा

दीपक कच्छवा
Saturday, 31 October 2020

वरखेडे - लोंढे बँरेज प्रकल्प 526 कोटी 68 लाख रूपये प्रकल्पाची किंमत आहे. वरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्पाचे काम जवळपास 95 टक्के काम पुर्णत्वास आले आहे.

मेहुणबारे (जळगाव) : खानदेशात शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्‍त्वकांक्षी असलेल्या वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाचे काम जवळपास 95 टक्के पूर्णत्वास आले आहे. या प्रकल्पात सध्या प्रत्यक्ष पाणी अडवण्यास तामसवाडी गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न असल्याने धरणाचे काम होवूनही प्रत्यक्ष पाणी अडवून ते शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोहचण्यास २०२२ उजाडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

वरखेडे - लोंढे बँरेज प्रकल्प 526 कोटी 68 लाख रूपये प्रकल्पाची किंमत आहे. वरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्पाचे काम जवळपास 95 टक्के काम पुर्णत्वास आले आहे. शासन दरबारी राजकीय इच्छाशक्तीने चुणूक दाखवून बंदीस्त चाऱ्यांबाबत तात्काळ निर्णय होवून हा प्रश्न मार्गी लागला, तर पुढील वर्षी धरणात पाणी अडवण्याचे नियोजन होवू शकते; अशीही माहिती समोर आली आहे. गेल्या सात वर्षापासून वरखेडे-लोंढे प्रकल्पाचे काम सुरु असून ते पूर्ण होण्याची प्रतीक्षा लागली आहे.

देशातील 16 प्रकल्पातील एक प्रकल्प 
वरखेडे येथील गिरणा नदीपात्रात सुमारे 526.65 कोटी रूपये खर्चाचा वरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. साडेसात हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतीक्षेत्र ओलतीखाली येवू शकणाऱ्या हा प्रकल्प देशातील 16 प्रकल्पातील एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा समावेश केंद्र सरकारच्या बळीराजा योजनेत समावेश करण्यात आल्याने नाबार्डकडून 214 कोटी रूपयांचे अर्थसहाय्य मिळाले आहे. मात्र गेल्या सात वर्षापासून ज्या गतीने काम सुरु आहे. त्या गतीने प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण होवून अडवलेले पाणी शेतकऱ्यांच्या बांधपर्यत कधी पोहचणार याची प्रतिक्षा आता शेतकऱ्यांना लागलेली आहे.

माती धरणाचे काम सुरु 
वरखेडे- लोंढे प्रकल्पाचे काम जवळपास 95 टक्के पूर्ण झाले आहे. माती धरणाचे काम व धरणाच्या गेटवरच्या रस्त्याचे काम असे पाच टक्के काम बाकी आहे. बाकी असलेले कामही देखील प्रगतीपथावर सुरु आहे. या धरणामुळे चाळीसगाव तालुक्यात 5 हजार 100 हेक्टर तर भडगाव तालुक्यातील 2442 हेक्टर अशी एकूण 7542 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होणार आहे. माजी आमदार राजीव देशमुख यांच्या काळात या प्रकल्पाला गती मिळली होती. तर तात्कालीन आमदार या प्रकल्पाला निधी मिळवून देण्यासाठी केंद्रांकडे पाठपुरावा केला. या प्रकल्पाचा केंद्राच्या बळीराजा योजनेत समावेश होवून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाला. आतापर्यंत या प्रकल्पावर 300 कोटी 68 लाख रूपये खर्च झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

120 कोटी वाचणार
वरखेडे बँरेज प्रकल्पाच्या कालवा कामासाठी जवळपास अंदाजित 450 कोटी रूपये खर्च लागणार आहे. मात्र पारंपारीक कालवा पद्धत ऐवजी बंदीस्त पाईपलाईन कालवा केल्यास भूसंपादनासाठी लागणारे 120 कोटी रूपये वाचू शकतात असे खासदार उन्मेष पाटील व पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले आहे. या तिन्ही लोकप्रतिनिधीनी कालव्याचे काम बंदीस्त पाईपलाईनद्वारे करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे धरणाचे काम पूर्ण होत आले; तरी जोपर्यंत कालव्याचे काम पूर्ण होवून धरणातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचत नाही. तोपर्यंत धरणाचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. यासाठी आणखी किमान दोन वर्षे लागू शकतात असे चित्र दिसत आहे.

पुनर्वसनाचा प्रश्न कधी सुटणार 
वरखेडे-लोंढे प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण होत आले तरी तामसवाडी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. यामुळे या प्रकल्पात पाणी अडवण्याला ब्रेक लागला आहे. आधी पुनर्वसन मग धरण अशी मागणी करीत तामसवाडी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलन करून धरणाचे काम बंद पाडले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची फाईल आजही पाटबंधारे विभागाकडे मंत्रालयात पडून आहे. आगामी काळात याबाबत कालवा समितीची बैठक होईल अशी माहिती मिळाली आहे. तामसवाडीकरांच्या आक्रमक भूमिकेमुळे यावर्षी पाणी अडवता आले नाही. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न आणखी किती दिवस लांबणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon varlhede londhe dam water use two year waiting farmer