विहिरीतून आला उग्र वास; पाहिले तर दिसला तरंगणारा मृतदेह

दीपक कच्‍छवा
Monday, 23 November 2020

मृत महिला कोण? कुठली? तिचा पाण्यात बुडून मृत्यु झाला की तिला कुणी विहीरीत ढकलून दिले? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत व ओळख पटवण्याच्या पलीकडचा होता.

मेहुणबारे (जळगाव) : उपखेड (ता.चाळीसगाव) शिवारात गिरणा पात्रालगत एका विहीरीत प्रौढ महिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. प्रथमदर्शनी विहीरीत पडून पाण्यात बुडून मृत्यु झाल्याचे म्हटले आहे. मृतदेह ओळखण्याच्या पलीकडचा असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवचिच्छेदन करून परिसरातच अंत्यविधी करण्यात आला. 

उपखेड (ता. चाळीसगाव) शिवारात गिरणा पात्रालगत अनेक विहीरी असून त्यापैकी एका विहीरीत अंदाजे 40 ते 50 वर्षीय अनोळखी महिलेचा पालथ्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळून आला. मृतदेह फुगलेला व उग्र वास येत असल्याने नागरीकांनी या घटनेची माहिती मेहूणबारे पोलीसांना दिली. हवालदार सुभाष पाटील व अन्वर तडवी यांनी घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला. मृत महिलेच्या अंगात लाल रंगाचे ब्लाऊज व केसरी रंगाची साडी होती. 

जागेवरच शवविच्छेदन
पट्टीच्या पोहणाऱ्यांनी मृतदेह विहीरीतून बाहेर काढला. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबेळकर यांनी जागेवरच शवविच्छेन केले. त्यानंतर आज दुपारी तामसवाडी, उपखेड, वरखेडे आदी गावांमधील पोलीस पाटीलांच्या उपस्थितीत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. याप्रकरणी सचिन प्रकाश बाविस्कर (रा. पिलखोड) यांनी दिलेल्या खबरीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार सुभाष पाटील करीत आहेत.

महीलेच्या हातावर नाव
मृत महिला कोण? कुठली? तिचा पाण्यात बुडून मृत्यु झाला की तिला कुणी विहीरीत ढकलून दिले? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत व ओळख पटवण्याच्या पलीकडचा होता. महिलेची ओळख पटून आली नाही. मात्र महिलेच्या हातांवर मिनाबाई अनिल पाटील असे नाव गोंदलेले आहे. मृत महिलेच्या शरीरावर कुठल्याही जखमा नसल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. महिलेची ओळख पटविण्यासाठी मेहूणबारे पोलीसांनी आवाहन केले आहे. परिसरात महिला बेपत्ताबाबतही पोलीसात कुठलीही नोंद नसुन बाहेरच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात ही माहीती दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon well water women dead body