राज्यातील हजारांवर व्यवसाय शिक्षकांची उपासमार 

सुनील पाटील 
Wednesday, 5 August 2020

शासन आदेशानुसार अशा सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर हजर असल्याचे समजण्यात यावे व त्यांना संपूर्ण वेतन देण्याचा आदेश संबंधित कार्यालयप्रमुखांना दिला

चोपडा  : व्यवसाय शिक्षकांना एप्रिलपासून शाळा सुरू होईपर्यंत वेतन न देण्याचा निर्णय समग्र शिक्षा, मुंबई यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ५२४ शाळांमधील एक हजार ४८ शिक्षकांची उपासमार सुरू आहे. 

केंद्र सरकारची माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील व्यवसाय शिक्षण ही योजना मुंबईच्या समग्र शिक्षा कार्यालयामार्फत राबविली जात आहे. याअंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालयाच्या २४ ऑगस्ट २०१४ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील महापालिका असलेल्या शहरात ५२४ पेक्षा अधिक शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण हा विषय सुरू करण्यात आला आहे. 

राज्यात एक हजार ४८ पेक्षा जास्त व्यवसाय शिक्षकांना या विभागाच्या दिरंगाई कारभारामुळे मागील सहा महिन्यांचे वेतन न मिळाल्याने कोरोनाच्या महामारीत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. मार्चपासून सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाच्या आदेशामुळे घरीच थांबावे लागत आहे. शासन आदेशानुसार अशा सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर हजर असल्याचे समजण्यात यावे व त्यांना संपूर्ण वेतन देण्याचा आदेश संबंधित कार्यालयप्रमुखांना दिला असताना, समग्र शिक्षा यांनी मार्चपासून शाळा सुरू होईपर्यंत वेतन न अदा करण्याचा निर्णय घेऊन शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. दुसरीकडे काही शिक्षकांचा स्त्रीधन विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. 

शिक्षकांची आर्त हाक... 
योजनेंतर्गत शिक्षकांना पूर्णवेळ शिक्षक म्हणून नियुक्ती दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पर्यंत १२ महिने पूर्ण वेतन दिले होते. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून १२ महिन्यांचे देण्यात येणारे वेतन कमी करून दहा महिने १५ दिवसांचेच अदा केले आहे. हा निर्णय रद्द करून कुटुंबाची होणारी उपासमार थांबवा, अशी आर्त हाक शिक्षकांनी दिली आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे नेर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chopada Thousands of business teachers starve in the state