चोपडा व पारोळ्यातील रथोत्सव रद्द; कोरोनाने केली परंपरा खंडित

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

श्री व्यंकटेश बालाजी संस्थानने सुमारे पाचशे वर्षांची परंपरा असलेला वहनोत्सव व रथोत्सव यंदा होणार नाही. चोपड्याचा सांस्कृतिक वारसा असलेला वहनोत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी या नवरात्र काळात शेकडो वर्षांपासून सुरू आहे.

चोपडा (जळगाव) : येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानतर्फे नवरात्रोत्सवात पार पडणारा वहनोत्सव व रथोत्सव यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय संस्थानचे अध्यक्ष विठ्ठलदास गुजराथी यांनी जाहीर केला आहे. तथापि, वहनोत्सव व रथोत्सवाचे कार्यक्रम भाविकांच्या श्रद्धांचा विचार करता मंदिरातच साजरा केला जाणार आहे. 
श्री व्यंकटेश बालाजी संस्थानने सुमारे पाचशे वर्षांची परंपरा असलेला वहनोत्सव व रथोत्सव यंदा होणार नाही. चोपड्याचा सांस्कृतिक वारसा असलेला वहनोत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी या नवरात्र काळात शेकडो वर्षांपासून सुरू आहे. नवरात्रीचे नऊ दिवस श्री बालाजी महाराज विविध वहनांवर आरूढ होऊन शहरातील विविध भागात भक्तांना भेटीसाठी जात असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या वहनोत्सवाचे जोरदार स्वागत होत असे. भाविक आपापल्या परिसरात श्रद्धेने आरती देऊन बालाजींचे स्वागत करीत असत. तसेच श्री व्यंकटेश बालाजी मंदिरापासून एकादशीला रथोत्सवानिमित्त रथारूढ श्री बालाजींचा रथ निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री भाविकांना दर्शनार्थ मुक्कामी ठेवण्याची परंपरा आहे. द्वादशीला बाजारपेठ मार्गाने बालाजी महाराजांचा रथ मंदिराजवळ परत येण्याचा शेकडो वर्षांचा इतिहास आहे. त्यानिमित्ताने शहरात यात्रा भरण्याची मोठी परंपरा पहिल्यांदाच स्थगित होत आहे. या वर्षी १७ ते २५ ऑक्टोबरदरम्यान वहनोत्सव पार पडणार होता. तर २६ व २७ ला रथोत्सव सालाबादाप्रमाणे पार पडणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव यंदा स्थगित करण्यात आला आहे. 

मंदिरातच होणार दर्शन 
आरोग्याच्या अभूतपूर्व आणीबाणीमुळे वहनोत्सव व रथोत्सव रद्द करण्यात आला असला, तरी भाविकांच्या सोयीसाठी दररोज विविध वहनांवर आरूढ होऊन मंदिरातच श्री बालाजी महाराज दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तसेच रथोत्सवदेखील मंदिराजवळच पार पडणार आहे. दररोज रात्री आठ ते नऊदरम्यान भक्तांना दर्शन करता येणार आहे. या वेळी भाविक भक्तांनी तोंडावर मास्क वापरून सोशल डिस्टन्सिंग ठेवत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या विश्वस्तांनी केले आहे. 

बालाजींना सोनसाखळी : 
दरम्यान, श्री व्यंकटेश बालाजींना स्टेट बॅंकेचे निवृत्त कर्मचारी बापूराव कुळकर्णी व त्यांचे पुत्र विवेक कुलकर्णी यांनी पूजाविधी करून सोनसाखळी अर्पण केली. या वेळी संस्थानचे विश्वस्त प्रवीण गुजराथी व कुलकर्णी कुटुंबीय उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chopda and parola balaji rathotshav cancal in coronavirus