अधिकारी आदिवासी कुटुंबांना घरोघरी रेशन कार्डांचे वाटप !

सुनील पाटील  
Wednesday, 16 September 2020

प्रत्येक गावातील गरजू लोकांचे अर्ज लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते गावोगाव जाऊन आज भरून घेत आहेत व सहा ऑक्टोबरला गावोगाव या कार्डांचे वाटप केले जाईल.

चोपडा : तालुक्यातील बहुतांश आदिवासी कुटुंबांकडे अजूनही रेशन कार्ड नाहीत, अशा सर्व ‘पेसा’ कुटुंबातील व्यक्तींना सहा ऑक्टोबरला गावोगावी जाऊन रेशन कार्ड वाटप केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार अनिल गावित यांनी दिली. 

येथील तहसील कार्यालयात तहसीलदार अनिल गावित यांच्या अध्यक्षतेखाली रेशन व रोजगारासंदर्भात लोकसंघर्ष मोर्चाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, बुधा बारेला, धर्मा बारेला, ताराचंद पावरा, प्रदीप बारेला, अनिल सपकाळे, गाजू बारेला आदी उपस्थित होते. 

तालुक्यात ‘पेसा’ गावे असून, अनेक गावे नवसंजीवनी योजनेत येतात व त्या सर्व गावांमधील आदिवासी जमातीच्या कुटुंबांना, आदिवासी मजूर, शेतमजुरांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत सुप्रिम कोर्टाने निकाल दिला आहे. त्यानुसार तालुक्यातील आदिवासी लोकांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करावे, अशी सूचना प्रतिभा शिंदे यांनी मांडली. प्रत्येक गावातील गरजू लोकांचे अर्ज लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते गावोगाव जाऊन आज भरून घेत आहेत व सहा ऑक्टोबरला गावोगाव या कार्डांचे वाटप केले जाईल. या कामात मोर्चाचे कार्यकर्ते तालुक्यातील ११६ गावांमध्ये जाऊन लोकांचे अर्ज भरून घेत शासनाला पूर्ण सहकार्य करतील. रेशन कार्डसाठी चलन भरण्याची रक्कम आदिवासी विकास विभाग उपलब्ध करून देईल, असेही श्रीमती शिंदे यांनी स्पष्ट केले. तहसीलदार गावित यांनी हा विषय तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले व तत्काळ कार्यवाहीदेखील सुरू केली. 

रेशन इतकाच महत्त्वाचा विषय हा रोजगाराचा असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था अत्यंत खिळखिळी झाली आहे व लोकांची क्रयशक्तीही संपली आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने ‘मनरेगा’अंतर्गत गावागावांत रोजगार आराखडे बनविण्यासाठी २५ सप्टेंबरला ग्रामसेवक, तलाठी व वनहक्क समितीचे अध्यक्ष व सरपंच यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्यानंतर रोजगार आराखडे गावागावांत तयार केले जातील.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chopda District administration officials will go home and give ration cards to the tribals