बैल बांधत असताना अचानक समोर आला बिबट्या

सुनील पाटील
Sunday, 13 December 2020

बिबट्या दिसल्‍याबाबत सालगडीने गावात दिल्याबरोबर गावातील नागरिक धावत आले. त्यांनाही बिबट्याचे दर्शन झाले.

चोपडा (जळगाव) : भारडू (ता.चोपडा) शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. यापूर्वी मोहिदा, घोडगाव शिवारात बिबट्याचा वावर वाढला होता. परंतु आज दुपारी भारडू (ता.चोपडा) शिवारातील मिलिंद पाटील यांच्या शेतात सालगडीला बैल बांधत असतांना अचानक बिबट्या दिसून आल्याने एकच धावपळ उडाली.
बिबट्या दिसल्‍याबाबत सालगडीने गावात दिल्याबरोबर गावातील नागरिक धावत आले. त्यांनाही बिबट्याचे दर्शन झाले. यातील शेतकरी मिलिंद पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून सदर माहिती दिली असता वनविभागाचे पथक दाखल झाले आहे. याबाबत वनविभागाचे अधिकारी प्रभारी वनक्षेत्रपाल दत्तात्रेय लोंढे यांच्याकडून माहिती घेतली असता जळगाव येथील ट्रॅप करणारे वनविभागाचे पथक दाखल होत असल्याचे माहिती दिली. 

बिबट्या जखमी असल्‍याचा अंदाज
बिबट्या हा जखमी असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याने तो 100 मीटरच्या परिसरातच दुपारपासून वावर करीत आहे. भारडू परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान भारडू परिसरातील शेती शिवारात, जंगलात दिवसा मोकाटपणे बिबट्या फिरत असल्याचे अनेकदा शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. बिबट्यास पकडण्यासाठी संध्याकाळी वन विभागाने तातडीने सापळा लावून बिबट्याचा बंदोबस्त करीत असल्याची माहिती मिळाली. यावेळी धुडकू पाटील, योगेश पाटील, पवन पाटील, भरत शिरसाठ, सुनील अहिरे, वना बोरसे, अशोक ठाकूर, स्वप्नील पाटील आदी नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chopda farm aria leopard sighting