शेतातला सडतोय, घरातला गरम होतोय! 

बाळकृष्ण पाटील
Friday, 25 September 2020

वेचून घरात आणलेल्या कापसाच्या सरकीत ओलावा असल्याने काही केले तरी तो गरम होऊन खराब होण्याची भीती असते. त्यामुळे नाइलाजाने तो कमी किमतीत विकावा लागत आहे. 
- रवींद्र लहू पाटील, कापूस उत्पादक, गणपूर 

गणपूर (ता. चोपडा) : पावसामुळे घरात वेचून आणलेला कापूस गरम होत असून, शेतात झाडावरील पक्क्या कैऱ्या सडत असल्याने उत्पादक अडचणीत सापडले आहेत. 
चोपडा तालुक्यात मेमध्ये लागवड झालेल्या कपाशीची कुठे पहिली, तर कुठे दुसरी वेचणी सुरू आहे. मात्र, पाऊस होत असल्याने घरात वेचून आणलेला कापूस गरम (हिट) होऊन खराब होत असून, शेतात सततच्या पावसामुळे झाडावरील कैऱ्या सडत आहेत. व्यापारी तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करीत असल्याने उत्पादकांची घुसमट होत आहे. 
चोपडा तालुक्यात पोळ्यापर्यंत कपाशीची स्थिती उत्तम होती. हंगाम चांगला येईल, असे वाटत असतानाच सततच्या पावसाने झाडावरील फुले, फुगडी गळून पडल्याने फक्त कैऱ्या राहिल्या. त्या फुटू लागताच पाऊस सुरू झाल्याने झाडावर असलेला कापूस खराब होत असून, वेचून घरात साठवून ठेवलेला कापूस गरम होऊ लागल्याने ‘इकडे आड- तिकडे विहीर’ अशा स्थितीत उत्पादक सापडला आहे. हा कापूस घरात ठेवला तर खराब होण्याची भीती आहे आणि विक्री केला तर तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटलने ‘खेडा’ खरेदी सुरू आहे. त्यामुळे आधारभूत किंमत वाढविली असली, तरी तिचा लाभ मिळणे अवघड आहे. तालुक्यात गेल्या पंधरवड्यात सुमारे पन्नास ट्रक कापूस वेचणी होऊन घरात आला असून, त्यातून दहा ते पंधरा ट्रक विक्री झाला आहे. 

 

कापसात बोंडअळी दिसू लागली 
गणपूर (ता. चोपडा) ः गेल्या काही वर्षांपासून कपाशी पिकाचे मोठे नुकसान करणारी बोंडअळी याही वर्षी वेचून आणलेल्या कापसात दिसू लागली आहे. कापूस वेचणी सुरू झाली, की साधारणपणे शेतकरी फवारणीकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचवेळी बोंडअळी सुरू होते. आता बोंडअळी दिसू लागल्याने पावसाच्या पाण्यावर लागवड झालेल्या कपाशीत तिचे प्रमाण वाढण्याचा धोका वाढला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chopda heavy rain droped cotton loss