अनेर परिसरात तिसऱ्यांदा शेकडो हेक्टर केळीचे नुकसान 

सुनील पाटील  
Monday, 19 October 2020

अचानक आलेला वादळी वारा व पावसाने कापणीवर आलेली शेकडो हेक्टर केळी पूर्णतः जमीनदोस्त झाली. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे.

 चोपडा, : तालुक्यातील पश्चिम भागातील अनेर परिसरात रविवार (ता. १८) व सोमवारी (ता. १९) असे सलग दोन दिवस चारच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने प्रामुख्याने तिसऱ्यांदा केळीपीक जमीनदोस्त झाले. याबाबत आमदार लता सोनवणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

वेळोदे, मोहिदे, अजंतीसीम, वढोदा, विटनेर येथे अचानक आलेला वादळी वारा व पावसाने कापणीवर आलेली शेकडो हेक्टर केळी पूर्णतः जमीनदोस्त झाली. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. यात, वेळोदे येथे अरुण सोनवणे, रमाकांत बोरसे, ईश्वर जैस्वाल, ताराचंद सोनवणे, कैलास सोनवणे, रंगराव देवराज यांसह शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

आमदार लता सोनवणे गेल्या शेतावर 

चोपड्याचे आमदार लता सोनववणे यांनी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याच्या गावांचा दौरा केला. यात मोहिदे, अजंतीसीम, वढोदा, विटनेर पाहणी दौरा केला. या वेळी तहसीलदार छगन वाघ यांना तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. या वेळी गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत देसाई, रोहिणी पाटील, राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील, माजी उपसभापती एम. व्ही. पाटील, युवासेना तालुकाप्रमुख गोपाळ चौधरी, प्रशांत पाटील, सुनील पाटील व शेतकरीबांधव, गावकरी उपस्थित होते.
 

संपादन- भूषण श्रीखंडे जळगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chopda many of hectares of crops were damaged due to heavy rains for the third time in Chopda