
चोपडा व यावलचे बालविकास प्रकल्प अधिकारी ही पदे रिक्त आहेत. या तिन्ही पदांवर प्रभारी पदभार असल्याने अंगणवाडी केंद्रांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नसल्याने ही पदे तत्काळ भरणे गरजेचे आहे.
चोपडा (जळगाव) : तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढले असून, काही अंगणवाडीच्या इमारती जुन्या व जीर्ण झाल्याने बालकांच्या जीवितास धोका असल्याची माहिती आमदार लता सोनवणे यांनी जिल्हा परिषद येथे महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत दिली. याबाबत तत्काळ कार्यवाही व्हावी, असे निवेदनही देण्यात आले.
या बैठकीत आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, मुख्याधिकारी डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते.
या वेळी आमदार सोनवणे यांनी माहिती दिली, की चोपडा व यावलचे बालविकास प्रकल्प अधिकारी ही पदे रिक्त आहेत. या तिन्ही पदांवर प्रभारी पदभार असल्याने अंगणवाडी केंद्रांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नसल्याने ही पदे तत्काळ भरणे गरजेचे आहे. तसेच चोपडा व यावल तालुक्यांत अंगणवाडीसेविकांची अनुक्रमे नऊ व दोन पदे व मदतनीसची ४१ व नऊ पदे रिक्त आहेत आणि चोपडा शहरात मदतनीसची पाच पदे रिक्त आहेत. चोपडा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ असल्याने, तसेच विद्यार्थी व स्तनदा मातांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही रिक्त पदे तत्काळ भरणे आवश्यक आहेत.
इमारतही नाही
चोपडा तालुक्यात १८ अंगणवाडी केंद्रांच्या इमारती लहान, जुन्या व जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास हानी होऊ शकते, यासाठी अशा ठिकाणी नवीन इमारती मंजूर कराव्यात. चोपडा तालुक्यात २१ व यावल तालुक्यात २७ अंगणवाडी केंद्रांसाठी इमारती नसल्याने विद्यार्थ्यांना पर्यायी जागा करून बसविण्यात येते. अशा ठिकाणी नवीन इमारतींची आवश्यकता आहे, चोपडा तालुक्यात ० ते पाच वयोगटांतील ३१ हजार ५१२ मुलांपैकी कमी वजनाचे तीन हजार १५ बालके व तीव्र कमी वजनाचे ३९६ बालके ऑक्टोबर महिन्यात आढळून आली. तसेच यावल तालुक्यातही ० ते पाच वयोगटांतील सहा हजार १९२ मुलांपैकी कमी वजनाचे ८९३ बालके व तीव्र कमी वजनाचे १३७ बालके ऑक्टोबर महिन्यात आढळून आली. चोपडा शहरात नव्याने सुरू होऊ शकणाऱ्या २१ अंगणवाड्यांना मंजुरी देण्यात यावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रभावी अंमलबजावणी करा
चोपडा व यावल तालुक्यांत अनुक्रमे तीव्र कुपोषित १२ आणि १७ व मध्यम कुपोषित ९१ आणि ५० बालके आढळून आल्याने कुपोषणाचे उच्चाटन करण्यासाठी ज्या उपयोजना शासनामार्फत राबविल्या जात आहेत त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. या मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहे.
संपादन ः राजेश सोनवणे