‘चोसाका’ चाके गतिमान होणार; भाडेतत्त्वावर देण्याच्या हालचाली 

सुनील पाटील  
Thursday, 1 October 2020

चोसाका सहयोगी किंवा भाडेतत्त्वावर घेण्यासाठी संजीवनी साखर कारखाना, द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष व संचालक कारखान्यातील उपकरणे, शेड, गुदामाची पाहणी करून गेले आहेत.

चोपडा ः चोपडा सहकारी साखर कारखाना सहयोगी किंवा भाडेतत्त्वावर देण्याबाबत संचालक मंडळाकडून कार्यवाहीला सुरवात झाली असून, या गाळप हंगामात साखर कारखान्याची चाके सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

अध्यक्ष अतुल ठाकरे, माजी उपाध्यक्ष चंद्रहास गुजराथी, नगरसेवक हितेंद्र देशमुख, माजी सभापती नारायण पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी (ता. २९) मुंबईत भेट घेतली. त्यांनी कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत चर्चा करून थकहमी मिळण्यासंदर्भात विनंती केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन विचारविनिमय करावा, थकहमीबाबत शिफारस करेन, असे सांगितले. उपमुख्यमंत्र्यांनी थकहमीबाबत हिरवा कंदील दिला असून, काहीअंशी ‘चोसाका’चा आर्थिक मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत. 

चोपडा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या आजारी आहे. चोपडा कारखाना सहयोगी अथवा भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात १३ ऑगस्ट २०१९ ला कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत ठरावही मंजूर झाला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली असून, लवकरच कारखाना सहयोगी किंवा भाडेतत्त्वावर देण्यात येणार असल्याची माहिती चोसाका अध्यक्ष अतुल ठाकरे यांनी दिली. याबाबत शासनाचा आदेशही प्राप्त आहे. चोसाका सहयोगी किंवा भाडेतत्त्वावर घेण्यासाठी संजीवनी साखर कारखाना, द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष व संचालक कारखान्यातील उपकरणे, शेड, गुदामाची पाहणी करून गेले आहेत. सर्व अटी व शर्तींची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांच्या उसाची थकीत रक्कम, कामगारांचे वेतन, पीएफ यांसह बुलडाणा पतसंस्थेचे थकीत कर्ज या सर्वांचा विचार करूनच कारखाना दिला जाणार आहे. योग्य तो मार्ग काढूनच चोपडा सहकारी साखर कारखाना सहयोगी किंवा भाडेतत्त्वावर दिला जाणार आहे. 

साखर आयुक्तांची भेट 
सोमवारी (ता. २८) पुणे येथील साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची ‘मिटकॉन’चे सीए जाधव, चोसाका अध्यक्ष अतुल ठाकरे, माजी उपाध्यक्ष चंद्रहास गुजराथी यांनी भेट घेऊन कारखाना सहयोगी किंवा भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात चर्चा केली. 

‘चोसाका’वर राष्ट्रवादीची सत्ता 
सद्यःस्थितीत ‘चोसाका’वर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. चोपडा साखर कारखान्यावर ९६ कोटींचे कर्ज आहे. यात कामगारांचे देणे, बुलडाणा पतसंस्था, शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट, टॅक्स, कामगारांचा पीएफसह अन्य देणी आहेत. याचा सर्व विचार करून चोसाका भाडेतत्त्वावर घेणारा तयार होणार आहे. २० वर्षांपासून चोपडा साखर कारखाना डबघाईत चालला आहे. या सर्व गोष्टींचा विचार घेणाऱ्याला करावा लागणार आहे. 

भूमिका स्पष्ट करावी : शेतकरी कृती समिती 
कारखाना सुरू होत असेल आणि शेतकरी व कामगारांचा प्रश्न सुटत असेल, तर आनंद आहे. चोसाका भाडेतत्त्वाने देण्याबाबत काय कार्यवाही सुरू आहे, याबाबत शेतकऱ्यांना कुठलीही माहिती नाही. नेतेही सांगत नाही व संचालक मंडळही माहिती देत नाही. शेतकरी म्हणून आपण काय भूमिका घ्यावी, याबाबत संभ्रमात आहेत. नेने व संचालकांनी कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा दिवाळीनंतर आम्ही आमच्या पद्धतीने मार्ग काढू, असे शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील यांनी सांगितले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chopda Movements were started to speed up the Chopda sugar factory by paying rent